स्वतंत्र मुख्याधिकाऱ्यांअभावी शहर विकास कामात अडथळा
By Admin | Updated: July 11, 2016 01:22 IST2016-07-11T01:22:44+5:302016-07-11T01:22:44+5:30
भाजपप्रणित राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील १० तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिला.

स्वतंत्र मुख्याधिकाऱ्यांअभावी शहर विकास कामात अडथळा
नगराध्यक्षांचा आरोप : शासनाने तत्काळ स्वतंत्र मुख्याधिकारी द्यावा
चामोर्शी : भाजपप्रणित राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील १० तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा दिला. चामोर्शी नगर पंचायतीला स्वतंत्र मुख्याधिकारी देण्यात आले नाही. नगर पंचायत अस्तित्त्वात येऊनही नवीन कर्मचाऱ्यांची भरती न झाल्याने पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी शहर विकास कामात प्रचंड अडथळा येत आहे. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचे नगर पंचायतीकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाही, असे प्रतिपादन चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांनी केले आहे.
चामोर्शी येथील वार्ड क्रमांक ५ मधील डोंगरी भागात जवळपास ८०० लोक वास्तव्यास आहेत. मात्र या नागरिकांना अद्यापही अस्थायी पट्टे देण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागते. चामोर्शी नगर पंचायतीची बैठक ११ मे २०१६ रोजी पार पडली. या बैठकीचे इतिवृत्त लिहिण्यात आले. मात्र कोणते निर्णय झाले तसेच ठराव घेण्यात आले, या संदर्भातील इतिवृत्त मुख्याधिकाऱ्यांनी आम्हा पदाधिकाऱ्यांना अद्यापही उपलब्ध करून दिले नाही. आता १२ जुलै रोजी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. स्वतंत्र मुख्याधिकाऱ्यांअभावी शहर विकास कामात गती नसल्याचे नगराध्यक्ष वायलालवार यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)