पुराच्या पाण्यामुळे ८५ गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:01:51+5:30
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून अहेरी, भामरागड व सिरोंचा तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. रविवारी भामरागड तालुक्यात १२६.५ मिमी, अहेरी तालुक्यात १०२.४ मिमी व सिरोंचा तालुक्यात १०१.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पुराच्या पाण्यामुळे ८५ गावांचा संपर्क तुटला
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील दोन दिवसांपासून भामरागड, सिरोंचा व अहेरी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यांमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीवर पाणी चढल्याने भामरागडसह तालुक्यातील ५० गावे, सिरोंचा तालुक्यातील १५ गावे व अहेरी तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून अहेरी, भामरागड व सिरोंचा तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. रविवारी भामरागड तालुक्यात १२६.५ मिमी, अहेरी तालुक्यात १०२.४ मिमी व सिरोंचा तालुक्यात १०१.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. छत्तीसगड राज्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या तीनही नद्या ओसंडून वाहत आहेत. भामरागडजवळील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी असल्याने भामरागडसह तालुक्यातील ५० गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडपासून जाणाऱ्या लाहेरी, कोठी व आरेवाडा मार्ग सुद्धा बंद आहे. भामरागड येथे शनिवारी सायंकाळी पाणी शिरले. रविवारी पाण्याची पातळी वाढतच होती. आलापल्ली-भामरागड, भामरागड-लाहेरी, भामरागड-कोठी, भामरागड-आरेवाडा, सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली मार्ग, अहेरी तालुक्यातील गडअहेरी नाल्यासमोरील गावांचा संपर्क तुटला आहे.
सिरोंचा शहराजवळून प्राणहिता नदी वाहते. या नदीची पाणीपातळी वाढली आहे. पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावरून सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील अमरावती येथे अमरादी नाला ओसंडून वाहत आहे. पुलावरून तीन फूट पाणी वाहत आहे. आसरअल्ली मार्गावरील पातागुडम गावातील बरीच झाडे कोसळली आहेत. मेडिगड्डा धरणाचे दरवाजे उचललल्याने पोचमपल्ली, आसरअल्ली, अंकिसा, गुमलकोंडा या गावातील शेतीमध्ये गोदावरी नदीचे पाणी शिरले आहे. प्राणहिता नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने गावातील नागरिकांना नदीवर भांडी, कपडे, बैल, वाहने धुण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कोतवालामार्फत दवंडी देण्यात आली. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस विभागाचे कर्मचारी कोतवाल, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. झिंगानूर-सिरकोंडा मार्गावरील नाला नदीच्या पाण्याने बंद झाला आहे. जाफ्राबाद नाल्यावरूनही पाणी आहे. पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सिरोंचा-आरअल्ली मार्गावरील सोमनपल्ली नाल्यावर पूल मंजूर झाला आहे. मात्र उंच पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. आता या नाल्याच्या पुलावरून पाणी असल्याने पातागुडम, कोर्ला, कोपेला, करजेली, सोमनपल्ली या गावांचा संपर्क तुटला आहे. कंबालपेठा येथील नाल्यावरही पाणी असल्याने परिसरातील गावे संपर्काबाहेर आहेत. पातागुडम मार्गावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प पडली होती. मेडिगड्डाच्या पाण्यामुळे शेतांना धोका निर्माण झाला आहे.
भामरागडातील ५० कुटुंब सुरक्षित स्थळी
सखल भागात वास्तव्यास असलेल्या भामरागड येथील वॉर्डामध्ये पर्लकोटा नदीचे पाणी जमा झाल्याने येथील ५० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पुलाकडे जाण्यास नागरिकांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, नायब तहसीलदार प्रकाश पोपुलवार, अमोल कांबळे, एसडीपीओ कुणाल सोनवाने, ठाणेदार गजानन पडाळकर, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सुरज जाधव पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुराचे पाणी दुकान व घरांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. भामरागड तालुक्याचा वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे.
गोदावरी व इंद्रावती नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
सिरोंचा, अहेरी व भामरागड तालुक्यासह छत्तीसगड राज्यातील बिजापूर व दंतेवाडा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पाथागुडम केंद्रावर पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे. तसेच चिंदनार, तुमनार येथे सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने इंद्रावतीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीवरील मेडिगड्डा धरणाचे ६५ दरवाजे उघडले आहेत. धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्राणहिता नदीची महागाव व टेकरा केंद्रावरील नोंदीनुसार पाणीपातळी धोकापातळीच्या खाली आहे. वर्धा नदीची पाणीपातळी बामणी व शिरपूर केंद्रावर सामान्य आहे. वैनगंगा नदीची पाणीपातळी पवणी व आष्टी केंद्रावरील नोंदीनुसार धोकापातळीच्या खाली आहे.