दिवाळी सणानिमित्त बाजारात गर्दी वाढली
By Admin | Updated: October 29, 2016 01:51 IST2016-10-29T01:51:15+5:302016-10-29T01:51:15+5:30
दिवाळी सणाला २६ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असली तरी बाजारात पाहिजे त्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी दिसून येत नव्हती.

दिवाळी सणानिमित्त बाजारात गर्दी वाढली
विविध वस्तूंनी सजली दुकाने : महिलांचंी विशेष उपस्थिती, रविवारपासून आणखी वाढणार गर्दी, रस्त्याच्या दुतर्फा लागली दुकाने
गडचिरोली : दिवाळी सणाला २६ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असली तरी बाजारात पाहिजे त्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी दिसून येत नव्हती. २८ आॅक्टोबरपासून मात्र गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठेत ग्राहकांच्या गर्दीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभर ग्राहकांनी बाजार फुल्ल भरला होता.
दिवाळी सणाला २६ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली. २६ आॅक्टोबरला वसुबारस होता. २७ आॅक्टोबर रोजी गुरूद्वादशी होती. मात्र ही दोनही सण गडचिरोली जिल्ह्यात फार काही साजरे केले जात नाही. २८ आॅक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. २९ आॅक्टोबर रोजी नरकचतुर्दशी आहे. हे दोन सण काही प्रमाणात साजरे केले जातात. मात्र खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण लक्ष्मीपूजेपासून जिल्ह्यात साजरा केला जातो. ३० आॅक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. ३१ आॅक्टोबरला बलिप्रतिपदा व १ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे. हे तीन दिवस विशेष साजरे केले जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी गडचिरोली शहरात गर्दी करू लागला आहे. शुक्रवारी प्रत्येक दुकानात ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. दिवाळीसाठी दुकाने सुद्धा सजविण्यात आली आहेत. दिवाळीचा प्रसाद म्हणून मिठाईचे वाटप केले जाते. बाजारात विविध प्रकारचे विविध रंगातील मिठाई उपलब्ध झाली आहे. सिलबंद पॉकेटसह खुली मिठाईसुद्धा विक्रीस ठेवण्यात आली आहे. दिवाळीमध्ये रांगोळीचे विशेष महत्त्व असल्याने रांगोळी खरेदी करण्यासाठी याही दुकानात महिलांची गर्दी असल्याचे दिसून येत होते.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकाने पूर्वीच्या तुलनेत अधिकच सजली आहेत. विविध प्रकारचे फराळ हॉटेलमध्ये उपलब्ध झाले आहेत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. काही भाविक लक्ष्मीची नवीन प्रतिमा खरेदी करून पूजा करतात. तर काही नागरिक मातीची लक्ष्मी खरेदी करतात. विविध प्रकारचे, रंगाचे व आकर्षक दिसणारे मातीचे दिवे सुद्धा बाजारात उपलब्ध झाले आहेत. पोलीस स्टेशनच्या समोर मुख्य मार्गाच्या बाजुला दिव्यांची दुकाने लागली आहेत. फ्लॉवरपॉटही विक्रीसाठी ठेवले आहे.