वनविभागाकडून दुग्ध उत्पादनास चालना

By Admin | Updated: January 18, 2015 22:43 IST2015-01-18T22:43:43+5:302015-01-18T22:43:43+5:30

पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाबरोबरच वनविभागानेही गडचिरोली जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढावे व या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा.

Driving milk from forest department | वनविभागाकडून दुग्ध उत्पादनास चालना

वनविभागाकडून दुग्ध उत्पादनास चालना

गडचिरोली : पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाबरोबरच वनविभागानेही गडचिरोली जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढावे व या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा. यासाठी वनविभागाने दोन वर्षात २०७ दुधाळ जनावरांचे वाटप केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जनतेने स्वत:च्या मुलाप्रमाणे जंगलाचे संरक्षण केले. मात्र जंगलामुळे नक्षलसमस्या निर्माण झाली, शासनाने मंजूर केलेले सिंचन प्रकल्प अर्ध्यावरच बंद पडले. त्यामुळे हेच जंगल आपल्या भविष्यावर उठले असल्याची समजूत नागरिकांमध्ये निर्माण व्हायला लागली होती. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याशिवाय जंगलाचे संरक्षण करणे अशक्य आहे. हे शासनाच्या व वनविभागाच्या लक्षात आले. त्यानंतर वनविभागाने प्रत्येक गावी वनव्यवस्थापन समिती स्थापन करून या समितीच्या माध्यमातून जंगलाचे संरक्षण करण्याबरोबरच समितीच्या सदस्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याचे धोरण स्वीकारले.
या अंतर्गत वनविभागाकडून स्थानिक नागरिकांना रोजगार प्राप्त होईल, यासाठी अगरबत्ती प्रकल्प, कुपकटाईचे वाटप, लाख उत्पादन, सिमेंटच्या विटा तयार करण्याचा प्रकल्प, वनौषधी तयार करण्याचा प्रकल्प तयार केला. याच्या माध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार मिळाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दुधाचे उत्पादन अत्यल्प होते. त्यामुळे बहुतांश दुध नागपूर व भंडारा येथून आयात केले जाते. स्थानिक नागरिकांना दुधाळ जनावरांचे वाटप केल्यास दुधाची समस्या दूर होण्याबरोबरच युवकांना रोजगार मिळेल. या उद्देशाने दुधाळ जनावरांचे ५० टक्के अनुदानावर वाटप करण्याची योजना वनविभागाने समोर आणली. ही योजना २०१३ पासून राबविली जात आहे. पहिल्या वर्षी ३९१ गायी वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यावरच्या अनुदानासाठी वनविभागाने ७८.४ लाख रूपयांची तरतूदही केली होती. त्यापैकी २०० जनावरांचे वाटप करण्यात आले. २०१४-१५ मध्ये ५० गायीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १० लाख ३६ हजार रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी सात गायींचे वाटप झाले आहे. दोन्ही वर्षात मिळून २०७ गायींचे वाटप करण्यात आले आहे.
वनविभागाकडून देण्यात येणारी गाय संकरीत आहे. सदर गाय खरेदीसाठी वनविभागाकडून २० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. उर्वरित २० हजार रूपये शेतकऱ्याला भरावी लागते. संकरीत गायी गावठी गायीच्या तुलनेत जास्त दुध देतात. हे जरी मान्य असले तरी या गायी येथील वातावरणात तग धरत नाही. त्याचबरोबर त्यांच्या देखभालीवर बराचसा पैसा खर्च होतो. कधी कधी गायीपासून मिळणारे उत्पादन कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होते. या गायींची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र गोठा असावा लागतो. त्यातुलनेत गावठी गाय व म्हैस कमी दूध देत असली तरी तिच्या देखभालीचा खर्च कमी आहे. त्यामुळे दुध उत्पादक गावठी गाय व म्हैस पालनास अधिक पसंती देत असल्याचे दिसून येते. परिणामी संकरीत गाय घेण्यास प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Driving milk from forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.