रेखाचित्र, अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 00:45 IST2017-03-21T00:45:18+5:302017-03-21T00:45:18+5:30
१ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१७ या कालावधीतील विभागीय परीक्षा बाबतचे पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

रेखाचित्र, अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
जि.प.चे काम प्रभावित : प्रशिक्षणाला भारमुक्त न केल्याचा निषेध
गडचिरोली : १ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१७ या कालावधीतील विभागीय परीक्षा बाबतचे पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मात्र आयटीआयमध्ये असलेल्या या प्रशिक्षणासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अनेक विभाग प्रमुखांनी अधिनस्त रेखाचित्र व अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांना भारमुक्त केले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद रेखाचित्र अभियांत्रिकी कर्मचारी संघटनेच्या बॅनरखाली सोमवारी एक दिवशीय कामबंद आंदोलन केले. दरम्यान जि.प.च्या प्रवेशद्वारावर प्रशासनाविरोधात निदर्शने केली.
या आंदोलनाचे नेतृत्व जि.प. रेखाचित्र, अभियांत्रिकी संघटनेचे अध्यक्ष शरद देविकर, सचिव वागुल नागदेवते, कोषाध्यक्ष दिवाकर ढवळे तसेच रेखाचित्र कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष जी. एन. दहिकर आदींनी केले. आंदोलनादरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाने जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल यांना निवदेन दिले. या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, संचालक तंत्रशिक्षण संचालनाकडून स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांचे गडचिरोली येथील आयटीआयमध्ये १ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१७ या कालावधीतील विभागीय परीक्षाबाबतचे पूर्वप्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाकरिता पात्र स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांना भारमुक्त करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र सदर कालावधीतील कामाचा व्याप व उद्दिष्ट पूर्तीचे कारण पुढे करीत जि.प. प्रशासनाने स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांना प्रशिक्षणाकरिता भारमुक्त करण्यास टाळाटाळ करीत आहे. जि.प. प्रशासनाकडून निर्धारीत प्रशिक्षण वेळापत्रकात बदल करण्याबाबत मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. याच प्रक्रियेत संपूर्ण प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात येत आहे. प्रशिक्षणाअभावी विभागीय परीक्षेची संधी संबंधित कर्मचाऱ्यांना गमवावी लागत आहे. परिणामी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहत आहे. जि.प. प्रशासनाकडून अशा प्रकारे अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अश्विनी कावळे, प्रशांत सरोदे, सुचिता वाघमारे, प्रिती नागपुरे, शितल दहेलकर, अश्विनी मेश्राम, प्रगती माकडे, दिवाकर शिंदे, धनंजय धोटे, विक्रांत मेश्राम, दिलीप सज्जनपवार, अमोल काळे, विशाल जवणे, अंकूश अंधारे, अतुल मेश्राम, रवींद्र कुमरे, प्रकाश मरस्कोल्हे आदी कर्मचारी सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)