नाली उपसा बंद
By Admin | Updated: April 3, 2015 01:17 IST2015-04-03T01:17:56+5:302015-04-03T01:17:56+5:30
२०१४-१५ या वर्षात नाली उपसा करण्याच्या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी संपूनही नगर परिषदेने दुसऱ्या

नाली उपसा बंद
गडचिरोली : २०१४-१५ या वर्षात नाली उपसा करण्याच्या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी संपूनही नगर परिषदेने दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यास विलंब लावला आहे. नवीन कंत्राटदारांची नेमणूक होण्यात आणखी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार असून तेव्हापर्यंत शहरातील नाल्या उपसणे बंद राहणार आहे. परिणामी शहरातील नाल्या तुंबून अस्वच्छतेची प्रचंड समस्या शहरात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संपूर्ण शहरात १४१.४० किमी लांबीच्या नाल्या बांधण्यात आल्या आहेत. शहरातील सांडपाण्याचा निचरा करण्याचे महत्त्वाचे काम नाल्यांच्या मार्फतीने केले जाते. त्यामुळे या नाल्यांचा वेळोवेळी उपसा होणे अत्यंत गरजेचे आहे. नगर परिषदेने मागील काही वर्षांपासून नाली उपसण्याचे कंत्राट देण्याचे धोरण अवलंबिले आहे. मागील वर्षी नाली उपसण्याचा कंत्राट ७२ लाख रूपयाने देण्यात आले होते. या निधीतून कंत्राटदाराने ६० मजुरांची नेमणूक केली होती. या मजुरांच्यामार्फतीने शहरातील नाली उपसण्याचे काम केले जात होते. सदर कंत्राट केवळ एका वर्षासाठी देण्यात आला होता व या कंत्राटाची मुदत १ एप्रिल रोजी समाप्त झाली. ही बाब नगर परिषद प्रशासनाला माहीत होती. त्यामुळे महिनाभरापूर्वी कामाच्या निविदा काढून १ एप्रिलपूर्वीच दुसरा कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही. नगर परिषदेच्यामार्फतीने फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत. फेरनिविदेमध्ये कंत्राटदार मिळाल्यास प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास आणखी १५ ते २० दिवसांचा विलंब लागणार आहे.
तोपर्यंत नाली उपसण्याचे काम थांबणार असल्याने शहरात प्रचंड कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. ६० मजूर काम करीत असतानाही काही वार्डातील नाल्या तुंबल्या असल्याची ओरड होत होती. २० दिवस नाली उपसा ठप्प राहणार असल्याने संपूर्ण नाल्या कचऱ्याने तुंबून आरोग्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
१५ ते २० दिवस नालीचा उपसा न झाल्यास शहरातील संपूर्ण नाल्या कचऱ्याने तुडूंब भरणार आहेत. परिणामी सांडपाण्यासह वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन नालीमध्येच पाण्याचे डबके निर्माण होणार आहेत. या पाण्यात डासांची पैदास वाढल्याने आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. काही नाल्यांमधील सांडपाणी नागरिकांच्या दारावरही येण्याची शक्यता आहे.