दोटकुलीत मृतकालाही मिळाले शौचालय

By Admin | Updated: April 26, 2017 01:01 IST2017-04-26T01:01:22+5:302017-04-26T01:01:22+5:30

चामोर्शी तालुक्याच्या दोटकुली ग्रामपंचायतमध्ये स्वच्छ भारत मिशनमधून वैयक्तिक शौचालयाचा लाभ दोन...

Dotkulit dead also got toilets | दोटकुलीत मृतकालाही मिळाले शौचालय

दोटकुलीत मृतकालाही मिळाले शौचालय

 लाभार्थी निवड यादीत प्रचंड घोळ : एकाच कुटुंबाला दोनदा लाभ
चामोर्शी : चामोर्शी तालुक्याच्या दोटकुली ग्रामपंचायतमध्ये स्वच्छ भारत मिशनमधून वैयक्तिक शौचालयाचा लाभ दोन वर्षापूर्वी मयत झालेल्या कासूबाई केशव पाल यांच्या भाच्याला वारसदार दाखवून निधीचा धनादेश वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. निवड यादीमध्ये बदल करून मंजूर यादीत नाव नसलेल्या लाभार्थ्यांच्या नावे धनादेश वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर शौचालयाचे बांधकाम न केलेल्या लाभार्थ्यांनाही धनादेश देण्यात आला आहे. हा सर्व प्रकार माहिती अधिकारातून माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर चुधरी यांनी माहिती मागितल्यामुळे उजेडात आला आहे.
दोटकुली येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बेस लाईन सर्वे करण्यात आला. यानुसार ३०९ कुटुंबांचा सर्वे झाला. त्यातील ७६ कुटुंबांकडे शौचालय असल्याने त्यांना वगळण्यात आले व उर्वरित २३३ लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली. परंतु या यादीत एकाच कुटुंबातील पती पत्नींची नावे आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय लाभार्थ्यांने बांधकाम केल्यानंतर ग्रामपंचायतीने शौचालय बांधकाम केल्याचा चौकशी अहवाल पंचायत समितीला पाठविला जाते. त्यानंतर पंचायत समिती शौचालयाची रक्कम ग्रामपंचायतकडे देते. त्यानंतर ग्रामपंचायत प्रोत्साहनपर रक्कम म्हणून संबंधित लाभार्थ्याला देते. परंतु दोटकुली ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी संगणमत करून शौचालय न बांधणाऱ्या लाभार्थ्यांनाही धनादेश दिला आहे. ज्यांचे मंजूर यादीत नाव नाही, अशाही लाभार्थ्यांना धनादेश दिले आहेत. १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत पंचायत समितीने २१८ लाभार्थ्यांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र ग्रामपंचायतीने २४ एप्रिल २०१७ पर्यंत केवळ १६८ लाभार्थ्यांनाच धनादेश दिले आहेत.
पं.स. आमसभेत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे ग्रामपंचायतीने दाखविले. मात्र उर्वरित लाभार्थ्यांना धनादेश का देण्यात आले नाही. याची चौकशी करणे आवश्यक आहे. सरपंच श्रीरंग बालाजी बोदलकर यांच्या पत्नी उर्मीला श्रीरंग बोदलकर यांचे नाव बेसलाईन सर्वेमध्ये आहे. त्यांच्याकडे शौचालय नसल्याचे दाखवून त्यांच्या नावाच्या ऐवजी त्यांची सासू लहानू बालाजी बोदलकर यांचे नाव टाकण्यात आले आहे. या कुटुंबाचा आयडी क्रमांक एकच दाखविण्यात आला आहे. म्हणजे ते कुटुंब संयुक्त आहे. श्रीरंग बालाजी बोदलकर हे सरपंच असल्यामुळे त्यांच्याकडे शौचालय असणे बंधनकारक आहे, असे असताना त्यांनी आपल्या आईच्या नावे शौचालयाचा लाभ उचलला आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच जानकीराम पत्रू ठोंबे यांनी त्यांनी पत्नी इंदिराबाई जानकीराम ठोंबे यांच्या नावाने शौचालयाचा निधी हडप केला आहे. जानकीराम कवडू पोरटे, निर्मलाबाई जानकीराम पोरटे हे पतीपत्नी आहेत. बेसलाईन सर्वेमध्ये त्यांच्याकडे शौचालय असल्याचे दाखविण्यात आले. तरीही जानकीराम पोरटे यांच्या नावाने शौचालय मंजूर करण्यात आले. त्यांनी शौचालय न बांधतातच धनादेशाची उचल केली आहे. लक्ष्मीबाई लटारू आभारे ही सात वर्षांपासून बेपत्ता आहे. परंतु ग्रामपंचायतीने तिला मयत दाखवून तिचे पती लटारू गोमा आभारे यांना वारसदार बनवून धनादेश दिला. ते सुध्दा मुलाकडे संयुक्त कुटुंबात राहतात. त्यांच्या सुनेने यापूर्वीच शौचालय योजनेचा लाभ घेतला आहे.
किसन पत्रू ठोंबे, दिपीका किसन ठोंबे, संदीप नक्टू बोदलकर, वनमाला संदीप बोदलकर हे पतीपत्नी असलेले जोडपे आहेत. या दोघांनाही शौचालय मंजूर झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

तक्रारीची चौकशी करण्याची मागणी
ज्या लाभार्थ्यांना शौचालयाच्या बांधकामाचे धनादेश देण्यात आले. त्यांच्या नावे घर आहे किंवा नाही, त्यांची नमूना ८ मध्ये नोंद आहे की नाही याची चौकशी होणे आवश्यक आहे. यासाठी जबाबदार असलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर सचिवावर कारवाई करावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर चुधरी यांनी केली आहे. सदर निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, पं.स. सभापती, संवर्ग विकास अधिकारी यांनाही पाठविले आहे.

 

Web Title: Dotkulit dead also got toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.