सर्पमित्राला बोलावण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:02 IST2025-01-09T15:34:33+5:302025-01-09T18:02:49+5:30
Gadchiroli : अवैधरित्या साप पकडण्याच्या प्रकाराला जिल्ह्यात ऊत

Do you have to pay to bring a snake charmer?
गडचिरोली : सर्पमित्रांच्या नावावर अवैधरित्या साप पकडण्याच्या प्रकाराला शहरासह जिल्ह्यातही ऊत आलेला आहे. अनेक स्वयंभू सर्पमित्र शहरासह गावांमध्ये मिरवतात. साप पकडल्याच्या मोबदल्यात पैसे मागतात. साप कोणत्या प्रकारचा आहे किंवा साप पकडण्याकरिता येण्यासाठी किती अंतर प्रवास करावा लागला यावरून त्याचा पैशांचा दर ठरतो. त्यामुळे पैसे पकडण्यासाठी सर्पमित्राला पैसे द्यायचे हा प्रश्न पडतो.
शहरात किती सर्पमित्रांची नोंद
गडचिरोली शहरातही बहुसंख्य सर्पमित्र आहेत. यापैकी ५ ते ७ सर्पमित्र नोंदणीकृत आहेत. बहुतांश साप पकडणारे व्यक्त्ती स्वतःला स्वयंभू सर्पमित्र समजतात.
साप दिसल्यास कोणाला माहिती द्यावी?
मानवी वस्तीत अनेकदा साप शिरतो. पावसाळ्यासह हिवाळ्यातही ही समस्या उद्भवते तेव्हा सापाला पकडण्यासाठी किंवा हाकलून लावण्यासाठी कोणाला कळवावे, असा प्रश्न पडतो.
स्थानिक वन कर्मचारी येतात का?
एखाद्या गावात किंवा वस्तीत साप दिसल्यास त्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविल्यास ते येत नाहीत. त्यामुळे अनेकजण सापाला जिवंत मारतात किंवा सर्पमित्राला बोलावितात.
अनेकजण मागतात पेट्रोल खर्च
साप पकडण्यासाठी अनेक सर्पमित्र पेट्रोल खर्च म्हणून २०० ते ३०० रुपये संबंधित व्यक्तीकडून मागतात. अनेकजण स्वखुशीने सुद्धा त्यांचा मेहनताना देतात.
सापांची मान पकडता येणे म्हणजे, सर्पमित्र नव्हे !
"एखाद्या व्यक्तीला सापाची मान, शेपटी पकडता येते, तेव्हा तो स्वतःला सर्पमित्र समजतो. साप अटॅक कसा करतो. त्यापासून आपण कसा बचाव करू शकतो. सापांचे विष व त्यांचे प्रकार यासह सापांविषयी इत्यंभूत माहिती व अभ्यास असणे आवश्यक आहे. याशिवाय समाजाला निःशुल्क सेवा देता आली पाहिजे."
- मिलिंद उमरे, मानद वन्यजीव रक्षक, गडचिरोली