अंधश्र्रद्धेत वेळ घालवू नका
By Admin | Updated: January 20, 2015 22:36 IST2015-01-20T22:36:28+5:302015-01-20T22:36:28+5:30
शेती कसण्यासाठी आधुनिक अवजारे उपलब्ध झाली आहेत. अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अंधश्रद्धा न बाळगता श्रम व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून उत्पादन घ्यावे.

अंधश्र्रद्धेत वेळ घालवू नका
ताडगावात जनजागरण मेळावा : नायब तहसीलदारांचे नागरिकांना आवाहन
भामरागड : शेती कसण्यासाठी आधुनिक अवजारे उपलब्ध झाली आहेत. अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अंधश्रद्धा न बाळगता श्रम व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून उत्पादन घ्यावे. अंधश्रद्धेत वेळ घालवू नका, असे आवाहन नायब तहसीलदार गावंडे यांनी केले.
उपविभागीय पोलीस विभागातर्फे ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या वतीने आयोजित जनजागरण मेळाव्यात गावंडे बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट राजेंद्रसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताडगावचे वनपरिक्षेत्राधिकारी अनिल गेडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी किरण दिडवाघ, पोलीस उपनिरीक्षक महारूद्र परझणे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर उदार, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक कुंजूर भरत सिंग, सियाराम, रामेश्वर, शेट्टी, माजी उपसभापती मादी आत्राम, सीताराम मडावी, आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक टांगसेलवार उपस्थित होते.
मेळाव्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल विभाग, पंचायत समिती, बालविकास प्रकल्प, वन विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग तसेच रोग निवारण समिती नागेपल्लीच्या वतीने स्टॉल लावून शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान नागरिकांना माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.
पोलीस मदत केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू तसेच विजेत्या संघाला बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दरम्यान ग्रामीण युवकांना खेळाचे साहित्य वितरीत करण्यात आले. नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीआरपीएफ व महसूल अधिकाऱ्यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी किरण दिडवाघ यांनी मानले. मेळाव्याला रेला, पोकूर, कोसपुंडी, कुडवेली, वटेली, बोटनफुंडी, मोकेला, पल्लो, कसनसूर, पडतमपल्ली, इकरडुम्मे, जिजगाव, चिचोडा, कोहकापारी व परिसराच्या गावातील नागरिक उपस्थित होते. सहभोजनाने जनजागरण मेळाव्याची सांगता करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)