दिव्यांग देविदास साेईसुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST2021-03-18T04:37:18+5:302021-03-18T04:37:18+5:30
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या कळमगावात चार ते पाच जण विविध अवयवांनी दिव्यांग आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या ...

दिव्यांग देविदास साेईसुविधांपासून वंचित
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या कळमगावात चार ते पाच जण विविध अवयवांनी दिव्यांग आहेत. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिव्यांगापर्यंत सोईसुविधा पोहाेचत नसल्याने, त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. कळमगावातील देविदास विश्वनाथ चुधरी यांना ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर ब्रेन ट्युमर या दुर्धर आजाराने ग्रासले. या आजारातून मुक्त होण्यासाठी २ लाख रुपये वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी खर्च केले. त्यानंतर, त्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला. कसेबसे नववीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर, त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला. देविदास हाताने व पायाने अपंग आहे. सध्या त्याला पत्नी, मुले आहेत. शासनस्तरावर अपंगांना अनेक सोईसुविधा दिल्या जातात. एवढेच नव्हे, तर अपंगांच्या कल्याणासाठी ग्रामपंचायत स्तरावर ३ टक्के निधी सोयीसुविधा पुरविण्यासाठी दिला जाताे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन देविदाससह अन्य चार अपंगांना कोणतीही सुविधा दिली नसल्याची खंत या लोकांनी व्यक्त केली. देविदास हाताने व पायाने अपंग असल्याने, त्याला कोणतेही अवघड काम करता येत नाही. उदरनिर्वाह करण्यासाठी लहान टपरीवजा किराणा दुकान सुरू केले आहे. त्यातही भांडवल नसल्याने, व्यवसायात प्रगती साधण्यासाठी अडचण येत आहे. त्याच्याकडे ट्रायसिकल नसल्याने यातना सहन कराव्या लागतात. शासनाच्या डझनभर योजना असतानाही देविदास अजूनही हलाखीचे जीवन जगत आहे.