खंडीवासीयांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:37+5:30

भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनावने यांच्या मार्गदर्शनाखाली नारगुंडा पोेलीस मदत केंद्राच्या हद्दीतील खंडी येथे शनिवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पोलीस विभागाकडून लग्न व इतर सामूहिक कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी भांडी, ताडपत्री व इतर साहित्य गावाला प्रदान करण्यात आले. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरूवात करण्यात आली.

Distribution of materials to continents | खंडीवासीयांना साहित्य वाटप

खंडीवासीयांना साहित्य वाटप

ठळक मुद्देआरोग्य तपासणी : जनजागरण मेळाव्यात दिली शासकीय योजनांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनावने यांच्या मार्गदर्शनाखाली नारगुंडा पोेलीस मदत केंद्राच्या हद्दीतील खंडी येथे शनिवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पोलीस विभागाकडून लग्न व इतर सामूहिक कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी भांडी, ताडपत्री व इतर साहित्य गावाला प्रदान करण्यात आले.
बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक सुरेंदरसिंग होते. प्रमुख अतिथी म्हणून खंडी येथील गावपाटील कटीया, नैनवाडीचे गावपाटील बाजीराव मडावी, पोलीस उपनिरीक्षक खडके, वनवे, अंगणवाडी सेविका रजनी कुड्यामी, आरोग्यसेवक पुरूषोत्तम कुमरे, आरोग्य विभागाचे निरीक्षक भुजाळे, प्रकल्पाचे संघटक कुळसंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस विभागामार्फत राबविण्यात येत असलेली नक्षल गावबंदी योजना, आत्मसमर्पण योजना व ‘द्या माहिती, व्हा लखपती’ आदी योजनांची माहिती दिली. याशिवाय महसूल विभाग, महावितरण व पंचायत समितीमार्फत नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय योजनांची विस्तृत माहिती देण्यात आली. याप्रसंगी चेन्नई येथे एमडीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विनोद एक्का या स्थानिक आदिवासी युवकाने शासनाच्या सर्व योजना उपस्थित आदिवासी बांधवांना माडीया भाषेत समजावून सांगितले. याप्रसंगी आरोग्य विभागामार्फत महिला, लहान मुले व वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आदिवासी विकास विभागाच्या निरीक्षकांनी आदिवासींसाठी असलेले घरकूल व इतर योजनांची माहिती देऊन लाभ देण्याचे आवाहन केले.
सदर मेळाव्यादरम्यान खंडीगावाला लग्न व इतर कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे भांडी व ताडपत्री आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना साडी व इतरांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संचालन पोलीस उपनिरीक्षक वनवे यांनी केले. यशस्वीतेसाठी जिल्हा पोलीस, सीआरपीएफ व एसआरपीएफचे अधिकारी व जवानांनी सहकार्य केले. सदर मेळाव्याला खंडीगावातील तसेच परिसरातील २०० वर नागरिक उपस्थित होते.

हस्तकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
पोलीस विभागातर्फे प्रत्येक पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे, मदत केंद्रस्तरावर राणी दुर्गावती महिला हस्तकला स्पर्धा आयोजित केली जात आहे. नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या वतीने खंडी येथे झालेल्या जनजागरण मेळाव्यादरम्यान राणी दुर्गावती हस्तकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये कुचेर, खंडी, नैनवाडी व नारगुंडा येथील महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत खंडी येथील रहिवासी फुलमनी तिरकी यांनी प्रथम, नैनवाडीच्या सुमा वेळदा यांनी द्वितीय तर कुचेरच्या नानी हेडो यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख तीन हजार, दोन हजार, एक हजार रुपये बक्षीस देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व भामरागडचे एसडीपीओ सोनावने यांच्या मार्गदर्शनाखाली हस्तकला स्पर्धा व जनजागरण मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.

Web Title: Distribution of materials to continents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.