एक हजार विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध धडे; ७४ रासेयाे अधिकाऱ्यांही समावेश

By दिलीप दहेलकर | Published: December 25, 2023 07:52 PM2023-12-25T19:52:12+5:302023-12-25T19:54:52+5:30

गडचिराेलीत पहिल्यांदाच शिबीर

Disaster management technical lessons to one thousand students; Including 74 political officers | एक हजार विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध धडे; ७४ रासेयाे अधिकाऱ्यांही समावेश

एक हजार विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध धडे; ७४ रासेयाे अधिकाऱ्यांही समावेश

दिलीप दहेलकर, गडचिराेली: स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या वतीने २५ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२४ या कालावधीत आयाेजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आव्हान-२०२३ चे साेमवारला थाटात उद्घाटन झाले. या शिबीराला २२ विद्यापीठांमधील ५८० विद्यार्थी आणि ४२० विद्यार्थीनी स्वयंसेवक असे एकुण १००० विद्यार्थी तसेच ३७ पुरूष कार्यक्रम अधिकारी आणि ३७ स्त्री कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले आहेत. या सर्वांना दहा दिवस आपत्ती निवारणाचे धडे देण्यात येणार आहे.

१० दिवस होणाऱ्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ३० समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सुमानंद सभागृह, गडचिरोली शासकिय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली व गाणली सभागृह, गडचिरोली, सुप्रभात मंगल कार्यालय, गडचिरोली येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या १० दिवस होणऱ्या प्रशिक्षणासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे ५० तज्ञ व्यक्ती आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देणार आहेत. 


शिबिराच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी मंचावर खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, पोलीस अधीक्षक निलोत्पल, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, राष्ट्रीय आपदा मोचनबलचे सहायक समादेशक प्रवीण धट, एन. डी.आर. एफचे सिनिअर इन्स्पेक्टर कृपाल मुळे, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे, कोल्हापूर विद्यापीठाचे रासेयो संचालक तानाजी चौगुले, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरुदास कामडी, प्रशांत मोहिते, प्रा.डॉ. विवेक जोशी, गोंडवानाचे परीक्षा संचालक डॉ. दिनेश नरोटे आदी उपस्थित होते. या साेहळयात राज्यपाल रमेश बैस यांनी आभासी पध्दतीने मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांसह राष्ट्रीय आपदा मोचन बल बलाचे सहाय्यक समादेशक प्रवीण धट यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. श्याम खंडारे, संचालन डॉ. शिल्पा आठवले यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले. यशस्वीतेसाठी सह समन्वयक डॉ. प्रिया गेडाम यांच्यासह विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच  शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले.


बाॅक्स .....
आपत्तीच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची?
या शिबिरात पूर, संर्पदंश, अपघात, हृदयविकार, आग, भुकंप आदी आपत्तीच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घेवून जिवित व वित्तहानी टाळता येईल. याबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोज योगा, मेडीटेशन, आपत्ती व्यवस्थापनाचे वर्ग, आपातकालीन परिस्थतीत लढण्याची पूर्वतयारी, आग नियंत्रित  करण्याच्या विविध पध्दती, पुरपरिस्थीती हाताळण्याचे प्रशिक्षण, मोटीव्हेशनल स्पीच असा दिवसभराचा कार्यक्रम राहणार आहे.

प्रात्याक्षिकही हाेणार
वर्गखोलीतील शिक्षणाशिवाय गडचिरोलीतील स्थानिक तलाव, विद्यापीठ  कॅम्पस परिसरात बिल्डींग डिझास्टर ऑपरेशन यांची रंगीत तालीम घेण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. ३१ डिसेंबर रोजी सुमानंद सभागृह ते इंदिरा चौक अशी रॅली काढण्यात येणार आहे.


प्रत्येक आपत्तीतून भारत सुरक्षित आणि विकसित करण्यासाठी पुढाकार घ्या - राज्यपाल 
गेल्या काही वर्षांत, भारताने आपत्तींना प्रतिसाद देण्यामध्ये, विशेषत: आपत्तीपूर्व शमनामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. सरकार सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आपत्ती व्यवस्थापनात विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विद्यार्थी आपत्तीबाबत जागरूकता पसरविण्यात मदत करू शकतात. आपत्तीसाठी तयार राहण्याच्या महत्त्वाबद्दल ते त्यांचे मित्र, कुटुंब आणि समुदाय सदस्यांना महत्त्वाचे संदेश देऊ शकतात. सामूहिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये स्वभावाने मोठे धैर्य आणि तग धरण्याची क्षमता असते. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे समाजाला मोठ्या गरजेच्या वेळी खूप मदत होते. प्रत्येक आपत्तीतून भारत सुरक्षित आणि विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.

प्रशिक्षणाचा फायदा हाेईल : कुलगुरु डॉ. बोकारे
आपदा प्रबंधनाचे प्रमुख कारण हे मानवनिर्मित असते. याचा नीट मुकाबला करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण देण्याची गरज असते. आपदा प्रबंधनाचे धडे हे सामान्य नागरिकांना दिले तर जीवित आणि वित्त होणार नाही. दहा दिवस होणाऱ्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करून घ्यायचा आहे. यातून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात जाऊन आपत्ती व्यवस्थापनाचे काम करतील आणि त्याचा फायदा समजला होईल, असा आशावाद कुलगुरू डाॅ. बाेकारे यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Disaster management technical lessons to one thousand students; Including 74 political officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.