दुष्काळग्रस्तमधून जिल्हा वगळणे लोकप्रतिनिधींचे अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:01 IST2018-11-02T00:00:53+5:302018-11-02T00:01:33+5:30
पाण्याअभावी जिल्हाभरातील पिके करपली आहेत. पाण्याची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत एका मीटरने खाली गेली आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. याला येथील लोकप्रतिनिधी व भाजपाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप आ.विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

दुष्काळग्रस्तमधून जिल्हा वगळणे लोकप्रतिनिधींचे अपयश
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पाण्याअभावी जिल्हाभरातील पिके करपली आहेत. पाण्याची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत एका मीटरने खाली गेली आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. याला येथील लोकप्रतिनिधी व भाजपाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप आ.विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. पोळ्यानंतर पावसाने कायमची दडी मारली. त्यामुळे सिंचनाची सुविधा नसलेले धानपीक करपले. त्याचबरोबर कापूस, सोयाबीन पिकालाही फटका बसला. जिल्हाभरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एटापल्ली, भामरागड, कोरची, कुरखेडा या तालुक्यांमध्ये भयावह स्थिती असून धान लागवडीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. इतरही तालुक्यातील धानपीक करपले आहे. अशी विपरित परिस्थिती असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला नाही. कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्वे केला जातो. त्यावेळी त्यांना योग्य सर्वे करण्याचे निर्देश देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. यावरून ते जनतेप्रती गंभीर नसल्याचे दिसून येते. त्यांची बांधिलकी जनतेशी नसून मतांशी आहे. राज्यभरात १५४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका नाही. अतिशय गंभीर बाब आहे.
लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर, नागभिड, सिंदेवाही हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले. हा भाग सुद्धा धानाचा पट्टा आहे. जेव्हा ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाली तर गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. मागील वर्षी मावा, तुडतुडा रोगाने हजारो हेक्टरवरील धानपीक उद्ध्वस्त झाले. या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत मिळाली नाही. ज्यांना मदत मिळाली, ती अतिशय कमी आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, डॉ.नितीन कोडवते, कुणाल पेंदोरकर आदी उपस्थित होते.