धर्मराव आत्रामांच्या बंधूचा भाजपात प्रवेश
By Admin | Updated: October 12, 2014 23:34 IST2014-10-12T23:34:17+5:302014-10-12T23:34:17+5:30
अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे बंधु जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांच्यासह अनेक

धर्मराव आत्रामांच्या बंधूचा भाजपात प्रवेश
अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व विद्यमान जिल्हाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे बंधु जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांच्यासह अनेक दिग्गज नेते व कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात आलापल्ली येथील जाहीर सभेत प्रवेश केला.
आलापल्ली येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा रविवारी पार पडली. या सभेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल आईलवार, पुलय्या इसनकर, सांबय्या तुमडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रवींद्रबाबा आत्राम यांनी पक्ष शिस्तीचा भंग केला म्हणून त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षातून निलंबित केले होते. आता रवींद्र आत्राम यांनी भाजपात प्रवेश केल्याने राज घराण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून राजे अम्ब्रीशराव मैदानात असल्याने रवींद्रबाबा आत्रामांच्या प्रवेशाला वेगळे महत्व आहे.
या जाहीर सभेला अम्ब्रीशराव महाराज, खासदार अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, भाजपचे प्रदेश सरचिटणीस बाबुराव कोहळे, अवधेशराव आत्राम, मधुकर नामेवार, भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अब्बास बेग, रहीमा सिद्धीकी, विनोद अकनपल्लीवार, माजी पं. स. सभापती मंदा गावडे, जि. प. सदस्य नंदा दुर्गे, पं. स. सदस्य सुनिता मंथनवार आदी उपस्थित होते.
संचालन सतीश गोटमवार यांनी तर आभार मुकेश नामेवार यांनी मानले. सभेला खा. अशोक नेते, अरविंद पोरेड्डीवार यांनीही मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)