मविआ सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची जास्त चिंता; फडणवीसांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 16:40 IST2022-04-04T16:21:12+5:302022-04-04T16:40:52+5:30
या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० मॅच सुरू आहे. दोन्ही टीम यांच्याच असून दोघेही हवा तितका भ्रष्टाचार करत आहेत. तू जास्त खातो की मी जास्त खातो ची चढाओढ सुरू आहे.

मविआ सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची जास्त चिंता; फडणवीसांचा हल्लाबोल
गडचिरोली : महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची जास्त चिंता आहे. या सरकारने गरिबांच्या तोंडचा घास काढून घेतला, असा जोरदार हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. मविआ सरकार हे भ्रष्टाचारी, घोटाळेबाज आणि अत्याचारी असल्याचेही ते म्हणाले.
ते आज गडचिरोलीत आजोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मविआ सरकारला धारेवर धरले. या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० मॅच सुरू आहे. दोन्ही टीम यांच्याच असून दोघेही हवा तितका भ्रष्टाचार करत आहेत. तू जास्त खातो की मी जास्त खातो ची चढाओढ सुरू आहे. यांचा जिथे जाऊ, तिथे खाऊ आपण सगळे भाऊ-भाऊ असा यांचा नारा आहे, असे फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी, मविआ सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांची वीज तोडण्याचा प्रयत्न या सरकारकडून सुरू आहे. शेतकऱ्यांच्याबाबतीत हे सरकार संवेदनहीन आहे. कोरोनाकाळात या सरकारने बारमालकांना मदत केली. विदेशी दारूवरचा ५० टक्के कर माफ केला. पण त्यांना शेतकऱ्यांचा विचार आला नाही. या महाराष्ट्रात बेडव्यांच सरकार आलं त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही, असे सुधीर मुंनगंटीवार म्हणाले होते. त्यांचं म्हणणं बरोबर असल्याचे दिसून येते, असेही फडणवीस म्हणाले.
आमच्या सरकारच्या काळात आम्ही दरवर्षी वेळेवर शेतकऱ्यांना बोनस दिलं. आता धानाच्या खरेदीचे सेंटर हे कुठे असतात, कधी निघतात, कोणाला मिळतात याबाबत काही सांगण्याची गरज नाही. या सत्तापक्षाचे सगळे नेतेच या धान खरेदी सेंटरचे मालक होत असून त्यातून वेगळा भ्रष्टाचार सुरू आहे. पण, आमच्या शेतकऱ्याला धानाच बोनस द्यायला हे सरकार तयार नाही. विदर्भातील पाच आणि कोकणातील तीन जिल्ह्यांनाच द्यायचे आहे, हे सुद्धा त्यांना देता येत नाही, असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.
या सरकारने वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारला. वेश्यांच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तोच शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, अशी टीका त्यांनी यावेळी केली.