विज्ञानाच्या सदुपयोगातून सर्वसामान्यांचा विकास व्हावा
By Admin | Updated: November 29, 2015 02:13 IST2015-11-29T02:13:22+5:302015-11-29T02:13:22+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कुटुंब अद्यापही दारिद्र्यात आहे. सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा सदुपयोग व्हावा,...

विज्ञानाच्या सदुपयोगातून सर्वसामान्यांचा विकास व्हावा
देवेंद्र भांडेकर यांचे प्रतिपादन : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीला प्रारंभ
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कुटुंब अद्यापही दारिद्र्यात आहे. सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा सदुपयोग व्हावा, असे प्रतिपादन गडचिरोली पंचायत समितीचे सभापती देवेंद्र भांडेकर यांनी केले.
तालुक्यातील आंबेशिवणी येथील विद्याभारती हायस्कूलमध्ये शनिवारी तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून जि.प. सदस्य प्रशांत वाघरे तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स. उपसभापती किशोर गद्देवार, दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, पं.स.सदस्य संध्या झंजाळ, गट शिक्षणाधिकारी उद्धव डांगे, आंबेशिवणीचे सरपंच माणिक झंजाळ, उपसरपंच प्रतीज्ञा राऊत, पोलीस पाटील देवेंद्र भैसारे, ग्रा.पं. सदस्य पौर्णिमा पाल, देविदास आत्राम, दादा चुधरी, प्राचार्य मुकूंद म्हशाखेत्री, प्राचार्य सागर म्हशाखेत्री आदी उपस्थित होते.
केवळ औपचारिकता म्हणून विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करू नये. संशोधनाची सांगड मानवता व विकासाशी जोडल्या गेली पाहिजे. प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगूण विज्ञानाचा उपयोग सर्वांगिण विकासासाठी करावा, असे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पं.स. उपसभापती किशोर गद्देवार यांनी क्रीडा संमेलन व विज्ञान प्रदर्शनातील जिल्हा परिषदेने निधी वाढवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, पं.स. सदस्य संध्या झंजाळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मनोज हुलके तर आभार प्राचार्य सागर म्हशाखेत्री यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)