वेलगूर परिसराचा विकास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 02:17 IST2016-09-07T02:17:18+5:302016-09-07T02:17:18+5:30
तालुक्यातील वेलगूर, बोटलाचेरू, नवेगाव या परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यात याव्या,

वेलगूर परिसराचा विकास करा
रस्ता रोको करण्याचा इशारा : गावकरी तहसीलवर धडकले
अहेरी : तालुक्यातील वेलगूर, बोटलाचेरू, नवेगाव या परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वेलगूर-बोटलाचेरू मार्गाचे सन २००७-०८ मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत काम करण्यात आले. या योजनेंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्ष देखभाल करण्याचे काम कंत्राटदाराचे राहते. मात्र कंत्राटदाराने अजूनपर्यंत फिरकूनही बघितले नाही. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे मानव विकास मिशनच्या बसेस सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यामुळे अनेक अपघात झाले असून पाच लोकांना जीव गमवावा लागला आहे. गावकरी त्रस्त झाले आहेत.
वेलगूर-नवेगाव-बोटलाचेरू गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, आदिवासी, गैरआदिवासी व पारंपरिक रहिवाशांना पट्टे देण्यात यावे, वेलगूर पीएचसी ते शंकरपूरपर्यंत रस्त्याचे बांधकाम करावे, वेलगूर येथे थ्री-जी सेवा सुरू करावी, २०१४-१५ चे तेंदू बोनस वितरित करावे, पांदण रस्त्याची मजुरी देण्यात यावी, जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत बांधून द्यावी, घरकूल योजनेचे देयके त्वरित द्यावे, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थ तालुका कचेरीवर धडकले. मागण्या पूर्ण न झाल्यास १४ सप्टेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला.
सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम यांच्या नेतृत्वात तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, संवर्ग विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वेलगूरचे सरपंच आशन्ना दुधी, किष्टापुरचे सरपंच अंजना पेंदाम, पंचायत समिती सदस्य आत्माराम गद्देकर, तंमुस अध्यक्ष रवींद्र उरेते, पोलीस पाटील मनोहर चालुरकर, सीताराम मेश्राम, राजेश उत्तरवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)