चार क्विंटल मोहफूल सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:46 IST2018-07-08T00:45:49+5:302018-07-08T00:46:10+5:30
तालुक्यातील गिलगाव जमी परिसरात अवैधरित्या मोहफुलाची दारू हातभट्टीवर काढली जात असल्याची माहिती मुक्तिपथच्या दारूबंदी महिला संघटनेला मिळताच महिलांनी घटनास्थळी धाड टाकून चार क्विंटल मोहफूल सडवा जप्त करून तो जागीच नष्ट केला.

चार क्विंटल मोहफूल सडवा नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील गिलगाव जमी परिसरात अवैधरित्या मोहफुलाची दारू हातभट्टीवर काढली जात असल्याची माहिती मुक्तिपथच्या दारूबंदी महिला संघटनेला मिळताच महिलांनी घटनास्थळी धाड टाकून चार क्विंटल मोहफूल सडवा जप्त करून तो जागीच नष्ट केला.
गिलगाव व गणपूर टोला येथील शेतशिवारात प्लास्टिकच्या ड्रममध्ये दारूसाठी सडवा ठेवला असल्याची माहिती दारूबंदी संघटनेच्या महिला व पुरूषांना मिळाली. त्यानंतर गावातील संघटनेच्या सदस्यांनी बैठक घेऊन धाड टाकण्याचे ठरविले. शेतशिवारात शोधमोहीम राबवून नऊ ड्रममध्ये असलेला मोहफूल सडवा जप्त केला. त्यानंतर पोटेगाव पोलीस मदत केंद्राला माहिती दिली. पोलीस मदत केंद्राचे पीएसआय डांगे, मारगोनवार, वनवे, एस.बी.उपरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर दारू व सडवा जागीच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामगोपाल आत्राम, रेखा कड्याम, संघटनेच्या अध्यक्ष आत्राम, रेखा आत्राम, विद्या शेंडे, प्रेमशाला आत्राम, साईनाथ कड्याम, मोहित उईके, दिनेश आत्राम, इंदिरा कुळमेथे, कविता शेवडे व संघनेच्या सदस्यांनी केले.
विशेष म्हणजे चामोर्शी मुक्तिपथ अभियानचे उपसंघटक रूपेश अंबादे, प्रेरक विनायक कुनघाडकर यांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. चामोर्शी तालुक्यात जंगलाच्या भागात मोठ्या प्रमाणावर हातभट्टीवर दारू काढून त्याची विक्री केली जात आहे. याविक्रेत्यांविरोधात मुक्तिपथ अभियानच्या दारूबंदी गाव संघटनांमार्फत धाडी टाकून कारवाई केली जात आहे.
नदी व नाल्यांचा आधार
अवैधरित्या हातभट्टीवर दारू काढण्यासाठी दारूविक्रेते नदी व नाल्याच्या किनाऱ्याचा आधार घेऊन दारू काढतात. चामोर्शी तालुक्यातील घोट, गुंडापल्ली व आष्टी भागातील काही गावांच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर हातभट्ट्याच्या माध्यमातून दारूची निर्मिती होत असल्याचे कारवाईतून दिसून येत आहे.