माझी वसुंधरा उपक्रमात देसाईगंज न.प. नागपूर विभागात अव्वल
By गेापाल लाजुरकर | Updated: June 6, 2023 17:54 IST2023-06-06T17:54:28+5:302023-06-06T17:54:57+5:30
गुणवत्ता स्पर्धा : राज्यात पटकाविले २५ वे स्थान

माझी वसुंधरा उपक्रमात देसाईगंज न.प. नागपूर विभागात अव्वल
गडचिराेली : राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत भरीव कामगिरी करणाऱ्या नगर पालिकांना पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये नागपूर विभागात देसाईगंज नगर पालिकेने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला तर राज्यात २५ वे स्थान प्राप्त केले.
महाराष्ट्र राज्य नगरविकास मंत्रालयाच्या नगर पालिका विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या गुणवत्ता स्पर्धेत देसाईगंज नगरपरिषदेने नागपूर विभागातून प्रथम तर राज्यातील नगरपरिषदेच्या यादीत २५ वे स्थान प्राप्त केले. नगरपरिषद क्षेत्रात पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरविकास मंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरपरिषदांना प्रोत्साहन बक्षीस म्हणून १ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. या अनुदानाचा उपयाेग देसाईगंज नगर पालिका क्षेत्रातील विकासकामांत करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांनी दिली. यापूर्वीही डॉ. रामटेके यांच्या नेतृत्वात देशपातळीवरील स्वच्छता अभियानात देसागंज नगरपरिषदेला ५ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला होता.