करारनाम्यास नकार
By Admin | Updated: March 25, 2015 01:43 IST2015-03-25T01:43:57+5:302015-03-25T01:43:57+5:30
हातपंपाच्या दुरूस्तीसाठी ग्रामपंचायतीने जि.प. यांत्रिकी विभागासोबत करारनामा करणे आवश्यक असतानाही ...

करारनाम्यास नकार
दिगांबर जवादे गडचिरोली
हातपंपाच्या दुरूस्तीसाठी ग्रामपंचायतीने जि.प. यांत्रिकी विभागासोबत करारनामा करणे आवश्यक असतानाही जिल्ह्यातील एकूण ९ हजार २६७ हातपंपापैकी १ हजार ८१६ हातपंपांचे करारनामेच करण्यात आले नाही. त्यामुळे या हातपंपांची दुरूस्ती अडचणीची ठरणार आहे.
नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी आमदार, खासदार निधी व जिल्हा परिषदेच्या विशेष योजनेतून ग्रामीण भागात हातपंप खोदून दिले जातात. हातपंप खोदण्यासाठी अनुदान मिळत असले तरी हातपंपाच्या दुरूस्ती व देखभालीसाठी मात्र राज्य शासनाकडून रूपयाचेही अनुदान प्राप्त होत नाही. त्यामुळे या हातपंपाची दुरूस्ती व देखभाल करणे ही सर्वस्वी ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. हातपंपामध्ये मोठा बिघाड निर्माण झाल्यास ग्रामपंचायत बऱ्याचवेळा दुरूस्त करू शकत नाही. त्याचबरोबर खासगी कंत्राटदाराच्या मार्फतीने ग्रामपंचायतीला हातपंप दुरूस्ती करणे परवडणारही नाही. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायत पंचायत समितीकडे हातपंपाचा करारनामा करून घेते. करारनामा केल्यानंतर वर्षभराच्या देखभाल व दुरूस्तीसाठी ग्रामपंचायतीला वार्षिक एक हजार ५०० रूपये पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाकडे जमा करावे लागतात. या एक हजार ५०० रूपयात यांत्रिक विभाग पंचायत समितीस्तरावर स्वतंत्र कर्मचारी नेमून पंचायत समितींतर्गत येणाऱ्या हातपंपांची दुरूस्ती करून घेतात. या कर्मचाऱ्यांचे वेतन करारनाम्यातून प्राप्त होणाऱ्या महसूलातूनच दिले जाते. त्यामुळे ज्या हातपंपाचा करारनामा झाला नाही, असे हातपंप दुरूस्त करून देण्याची जबाबदारी यांत्रिक विभागाची राहत नाही. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९ हजार २६७ हातपंप, ९६ वीजपंप आहेत. यापैकी केवळ ७ हजार १३५ हातपंपांचे व २४ वीज पंपाचे करारनामे करण्यात आले आहेत. तर १ हजार ८१६ हातपंप व ७२ वीजपंपांच्या दुरूस्ती व देखभालीचे करारनामे करण्यात आले नाही. या हातपंप व वीजपंपांच्या दुरूस्तीचा कर ग्रामपंचायत यांत्रिकी विभागाकडे भरत नसल्याने यांत्रिकी विभाग दुरूस्तीच करून देणार नाही.
उन्हाळ्याची चाहूल सुरू झाल्याने बंद असलेल्या हातपंपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र करारनामा न झाल्याने या हातपंपांची दुरूस्ती ग्रामपंचायतींसाठी डोकेदुखी ठरणार आहे.