साखरीटोला परिसरातील गावात डेंग्यूचा कहर
By Admin | Updated: September 1, 2014 23:35 IST2014-09-01T23:35:38+5:302014-09-01T23:35:38+5:30
सालेकसा तालुक्यातील कोटरा गावाच्या पाठोपाठ आता साखरीटोला परिसरातील अनेक गावांत डेंग्यूने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साखरीटोला परिसरातील गावात डेंग्यूचा कहर
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा गावाच्या पाठोपाठ आता साखरीटोला परिसरातील अनेक गावांत डेंग्यूने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच साखरीटोला गावाला लागून असलेल्या आमगाव व सालेकसा तालुक्यातील अनेक गावे डेंग्यूच्या विळख्यात सापडली आहेत.
यात तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या वडद, सोनेखारी, कवडी, कन्हारटोला, रामपूर, अंजोरा गावात डेंग्यूचे बरेच रुग्ण आढळले. तर सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सलंगटोला, चर्जेटोला येथे डेंगुचे रुग्ण आढळल्याची माहिती अहे. त्यामुळे परिसरात डेंग्यू आजाराचे तैमान सुरू असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अजून काही गावे डेंग्यूच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण परिसर डेंग्युमय होऊ शकतो. याकडे आरोग्य विभागाने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी केली जात आहे.
कोटरा गावाला वगळले तर या संपूर्ण गावाकडे आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोटरा गावातील लीलाधर क्षीरसागर, दिपाली बोहरे, मानीकचंद मानकर, सलंगटोला येथील रंजित दाते, मधू दोनोडे, ललित दोनोडे, सोनेखारी येथील योगेश्वरी पटले, कवडी येथील आशीष साखरे, अक्षय उईके, अंजोरा येथील कांची राणे, राहुल रहांगडाले, भूमेश्वर रहांगडाले, वैशाली अंबुले, तिरखेडी येथील योगेश्वरी मडावी, वडद येथील शालिकराम पारधी, रामपूर येथील उदल बहेकार, कन्हारटोला येथील रमेश तांडेकर, मुकेश ताडेकर, सुनील रहिले, बालू ब्राह्मणकर, चर्जेटोला येथील मनोहर चर्जे, वंदना चर्जे, स्वाती चर्जे, मयाराम चनाप, डेंग्यूसारख्या आजाराने ग्रस्त असून यातील बरेच रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती आहे.
काही रुग्ण गोदियाच्या केटीएस रुग्णालयात उपचार घेत आहेत. अंजोरा गावातील बरेच रुग्ण गोंदिया येथील खासगी रुग्णालयात तर काही साखरीटोला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बऱ्याच दिवसांपासून पाऊस न पडल्याने वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने डासांची संख्या वाढली आहे.
त्यामुळे तापाचे प्रमाण वाढले. मात्र यात डेंग्यूग्रस्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचे जानवते.
विविध रोगाने आजारी रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी डॉक्टरांची चांदी आहे.
या परिस्थितीमुळे असे लक्षात येते की शासनाचे आरोग्य विभागावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र रोगावर आळा घालण्यास यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
यामुळे लोकांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)