सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:37 IST2021-03-26T04:37:07+5:302021-03-26T04:37:07+5:30
गडचिराेली : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली ...

सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी
गडचिराेली : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथे हातपंपावर सौरऊर्जा बसविल्यास नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही सोय होणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा पंप बसवावा, अशी मागणी आहे.
तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
देसाईगंज : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवा
आरमाेरी : आजच्या युग हे डिजिटल युग आहे. सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र ग्रामीण भागात संगणक प्रशिक्षणसंदर्भात कोणत्याही प्रशिक्षण संस्था नसल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी होत आहे.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
वैरागड : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत. बोगस लाभार्थ्यांची नोंदणी होऊन त्यांना लाभ मिळाला आहे. मात्र काम करणारे लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत.
धूर फवारणी करण्याची मागणी
गडचिराेली : शहरातील काही वाॅर्डात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांत आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शहरातील वाॅर्डांमध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
दुर्गम भागात कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन सुरू
धानोरा : तालुक्यासह अहेरी उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्याच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कर्तव्याला दांडी मारली. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडली आहेत. मुख्यालयाची सक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
आष्टी : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
देऊळगाव येथे जलद बसचा थांबा द्या
आरमोरी : देऊळगाव येथून अनेक विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय सिर्सी, इंजेवारी येथील नागरिकही देऊळगाव बसथांब्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे देऊळगाव येथे जलद बसचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी आहे.
बालकांमध्ये वाढतेय चायनीजचे आकर्षण
चामाेर्शी : शहरातील मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी चायनीजचे हातठेले सुरू करण्यात आले आहेत. शाळकरी विद्यार्थी व युवक चायनीज पदार्थ खातात.
मार्गदर्शन शिबिर घ्या
अहेरी : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. मात्र नोकरीचे प्रमाण कमी झाल्याने बेरोजगारांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बेरोजगारांना व्यवसायाकडे वळविण्याच्या दृष्टिकोनातून सरकाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला
आष्टी : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हे कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, रस्त्यावर इकडे-तिकडे भटकतात.
तृतीय व चतुर्थ श्रेणीतील भरती करावी
गडचिराेली : कला शाखेतील हजारो विद्यार्थी तृतीय श्रेणीने उत्तीर्ण होतात. या शाखेतील पुढचे शिक्षण घेऊनही नोकरीची हमी नाही. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. शासनाने विविध विभागांतील तृतीय व चतुर्थ श्रेणींच्या नोकरभरतीवर बंदी घातली; तर दुसरीकडे ग्रामीण भागात महाविद्यालयांची संख्या वाढत आहे.
आरमोरीत स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित स्वच्छतागृहे तयार केली आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
वीज तारांनजीकच्या झाडाच्या फांद्या तोडा
चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये विजेच्या तारांलगत मोठमोठी झाडे आहेत. शिवाय फांद्या वाढल्याने त्या तारांना स्पर्श करीत आहेत. वादळामुळे झाडांच्या फांद्या तारांवर पडल्यास तार तुटून दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘महावितरण’ने वीजतारांलगतच्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तलावाच्या नहरात झुडपी जंगल
चामाेर्शी : तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशयामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली आहे. मात्र, तलावाच्या नहराची दुरवस्था झाली असून, झुडपे वाढली आहेत. भविष्यात शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नहराच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
मैदानी खेळांबाबत जनजागृती गरजेची
कुरखेडा : काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जायचे. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असायचे. मात्र, सध्या मुले मैदानी खेळ खेळताना दिसत नाहीत. मोबाईल गेमने हा ट्रेंडच बदलवून टाकला आहे. आता मुले मोबाईलवरच विविध खेळ खेळताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मैदानी खेळांची गरज आहे.
विजेचा लपंडाव वाढला
कोरची : कोरची तालुका नक्षलग्रस्त जंगलाने व्याप्त आहे. तालुक्यातील अनेक गावे डोंगरदऱ्यांत आहेत. त्यामुळे जंगलातून विद्युतलाईन गेली आहे. अनेक वर्षांपासून या भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या आहे. मात्र, या समस्येची सोडवणूक झाली नाही.
प्रशिक्षण देण्याची द्या
देसाईगंज : मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक स्रोत वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी आहे.
सोयी-सुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चार्मोशी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. येथे सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी या वस्तीतील नागरिकांकडून हाेत आहे.
शासकीय इमारतीची पुनर्बांधणी करावी
गडचिराेली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयांच्या इमारतींची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. ही कार्यालये जीर्ण झाल्याने बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे; परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासकीय अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कार्यालयातील तक्रारपेट्या गायब
आरमाेरी : शासकीय कार्यालयांत काही वर्षांपूर्वी तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश कार्यालयांतील तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. दरम्यान, तक्रार करण्यासाठी सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा
गडचिराेली : जिल्ह्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; पण विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. यंदाच्या पावसाळ्यात पूर आल्याने उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारला जात आहे.
शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी
चामाेर्शी : आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे योजनांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात योजनाच पोहोचल्या नाहीत. राज्य शासनाने निधीची तरतूद करून जिल्ह्यासाठी देण्याची मागणी आदिवासी संघटनांनी निवेदनातून केली आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
अत्यल्प बससेवेमुळे प्रवासी त्रस्त
चामाेर्शी : मूल मार्गावर अत्यल्प बसफेऱ्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावर बससेवा वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत
देसाईगंज : जिल्ह्यातील काही गावांत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जात आहेत. संबंधित विभागाने अवैध वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बीएसएनएलमधील रिक्त पदे तत्काळ भरा
गडचिराेली : जिल्ह्यातील अनेक दूरभाष केंद्रातील प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील कारभार रामभरोसे सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे त्या सोडविण्यासाठी रिक्त पदे भरावीत, अशी मागणी केली जात आहे.
पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी
धानाेरा : तालुक्यातील अनेक गावांतील जलकुंभ शोभेच्या वास्तू ठरल्या. पाणीपुरवठा योजना मंजूर असतानाही कामेच सुरू झाली नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर होत आहे.
मोकाट जनावरांचा चौका-चौकांत ठिय्या
आष्टी : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला. ही जनावरे रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांचा अपघात होण्याचा धोका आहे. मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.
वाहनधारकांना शिस्त लावणे गरजेचे
गडचिराेली : शहराची मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चाैकात असून, अनेक दुकाने आहेत; परंतु काही ग्राहक स्वत:ची वाहने पार्किंगमध्ये न ठेवता रस्त्यावरच लावतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. संबंधित विभागाने रस्त्यावरील पार्किंग हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासाठी निवेदनही दिले आहे. मात्र, उपाययोजना करण्यात आली नाही. कारवाई हाेत नसल्याचे दिसून येत आहे.