अतिक्रमण हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:08 IST2021-02-18T05:08:35+5:302021-02-18T05:08:35+5:30

देसाईगंज : नगरपालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लास्टिक पन्न्यांचा वापर करतात. अनेकजण दुकान बंद ...

Delete encroachment | अतिक्रमण हटवा

अतिक्रमण हटवा

देसाईगंज : नगरपालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लास्टिक पन्न्यांचा वापर करतात. अनेकजण दुकान बंद झाल्यानंतर या पन्न्या व प्लास्टिक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी.

वाहनांचे अतिक्रमण वाढले

देसाईगंज : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली, तरी देसाईगंज येथे या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अतिक्रमणामुळे देसाईगंज शहरामध्ये वाहतुकीची कोंडी आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

पोर्ला बसस्थानकावर गतिरोधक उभारा

गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.

बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण

धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु याकडे दुर्लक्षच असल्याचे दिसून येते.

देऊळगाव येथे जलद बसचा थांबा द्या

आरमोरी : आरमोरी-गडचिरोली मार्गावरील देऊळगाव हे मोठे गाव आहे. देऊळगाव येथून अनेक विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय सिर्सी, इंजेवारी येथील नागरिकही देऊळगाव बसथांब्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे देऊळगाव येथे जलद बसचा थांबा द्यावा.

वाहन बंदीकडे दुर्लक्ष

गडचिरोली : शहरातील पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडी बाजार या मार्गावर चारचाकी वाहनांना तसेच जड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परिसरातील त्रिमूर्ती चौकात बाजारपेठ असल्याने येथे चारचाकी व दुचाकी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या परिसरातून एकतर्फी वाहतूक केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

पेट्रोलची अवैध विक्री

आष्टी : चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा घेतात.

गंजलेले खांब धाेकादायक

सिरोंचा : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. हे खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा हे खांब बदलण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु या मागणीकडे नगरपंचायतीने दुर्लक्ष केले.

माेकाट जनावरे वाढली

जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे तो खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे त्यांचे शेण पडून राहते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

मोबाईल सेवा कुचकामी

कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांकडून होणारे ऑनलाईन काम प्रभावित झाले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. या भागात अनेक ग्राहक माेबाईल इंटरनेटचा वापर ऑनलाईन कामासाठी करतात.

जाचक अटीं रद्द करा

गडचिरोली : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. मात्र कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वनहक्क पट्टे निकाली काढावे, अशी मागणी होत आहे.

कोडसेपल्लीत समस्या

अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. गावात मूलभूत साेयी-सुविधा पुरवून रस्ते व नालीचे बांधकाम करावे.

कार्यालये पडली ओस

गडचिराेली : येथील पंचायत समिती, शिक्षण विभागाच्या कार्यालयात अत्यल्प कर्मचारी दिसून येत आहेत. जि. प. बांधकाम विभागाच्या कार्यालयातही कर्मचाऱ्यांची वानवा आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने अनेक कर्मचारी शुक्रवारीच कार्यालय साेडतात. त्यानंतर साेमवारीच कार्यालयात हजर हाेतात.

रिफिलिंग व्यवस्था सुधारा

देसाईगंज : वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र गॅस रिफिलिंगची व्यवस्था मोठ्या गावात दूर अंतरावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

प्रवासी निवारा जीर्ण

धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. प्रवाशांना उन्हातान्हात आणि पावसात दुसरीकडे आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे दुरूस्तीची गरज आहे.

Web Title: Delete encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.