दबक्या पावलांनी आली... ग्रामस्थांच्या सतर्कतेने पुन्हा जंगलात गेली!
By संजय तिपाले | Updated: May 17, 2023 14:10 IST2023-05-17T14:09:50+5:302023-05-17T14:10:44+5:30
सुंकरअल्ली गावात १७ मे रोजी एक हरीण पाण्याच्या शोधात आले. या हरणाला श्वानांनी घेरले

दबक्या पावलांनी आली... ग्रामस्थांच्या सतर्कतेने पुन्हा जंगलात गेली!
गडचिरोली: जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३ अंशावर गेल्याने मानवांसह वन्यप्राण्यांच्या जिवाची अक्षरश: काहिली होत आहे. वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने पाण्याची सोय केलेली आहे, पण दुर्गम, अतिदुर्गम भागात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. तहानेने व्याकूळ झालेले एक हरीण १७ मे रोजी सकाळी सिरोंचा तालुक्यातील सुंकरअल्ली गावात पाेहोचेले, पण दबक्या पावलांनी पोहोचलेल्या या हरणाला भटक्या श्वानांनी घेरले. ग्रामस्थांनी श्वानांच्या तावडीतून सुटका करत हरणाला जीवदान दिले.
सुंकरअल्ली गावात १७ मे रोजी एक हरीण पाण्याच्या शोधात आले. या हरणाला श्वानांनी घेरले. भेदरलेले हरीण कावरे-बावरे झाले. त्यास काही सूचत नव्हते. यावेळी पोलिस पाटील रत्नाकर चौधरी, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समय्या चौधरी, रमेश धनी यांनी श्वानांना हुसकावत हरणाला सुरक्षित ताब्यात घेतले.त्यानंतर असरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात फोनवरुन माहिती दिली.क्षेत्र सहायक के.एस.शेख, वनरक्षक आर.पी.गेडाम, एम.एच.कोल्हे, वाहनचालक सुनील मुरमाडे यांनी रोजंदारी मजुरांसह सुंकरअल्ली गाठले.
या हरणाला पाणी पाजून नंतर जीपमधून असरअल्ली जंगलात नेले, तेथे दोर सोडून त्यास मुक्त केले. त्यानंतर टुणकन् उड्या मारत क्षणार्धात ते जंगलात गुडूप झाले.