एटापल्लीत होणार डेडीकेटेड कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:46+5:30
एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी निर्माण होत असलेल्या नवीन शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत सुरूवातीला विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. परंतु तालुक्यात कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने विलगीकरण कक्षाचे रूपांतर कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात आले.

एटापल्लीत होणार डेडीकेटेड कोविड सेंटर
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने विलगीकरण केंद्राचे कोरोना केअर सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले. परंतु रुग्णांना बाहेर रेफर करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन येथे आता डेटीकेटेड कोविड हेल्थ सेंटर तयार केले जाणार आहे. या प्रस्तावित हेल्थ सेंटरच्या व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी दीपक सिंगला व सीईओ कुमार आशीर्वाद यांनी बुधवारी केली. डीसीएचसीमध्ये ५० बेड्सह अन्य आरोग्यविषयक सुविधा राहणार आहेत.
एटापल्ली येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी निर्माण होत असलेल्या नवीन शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत सुरूवातीला विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. परंतु तालुक्यात कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळल्याने विलगीकरण कक्षाचे रूपांतर कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात आले.
अनेक कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना आलापल्ली तसेच गडचिरोली येथे नेणे वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे नसल्याने याच सेंटरमध्ये आता डीसीएचसी निर्माण केले जाणार आहे. या केंद्रातील व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी करून तालुक्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला व त्यादृष्टीने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी जि.प.सीईओ कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनुज जिंदल, संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नटवरलाल श्रुंगारे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे उपस्थित होते.
हे रुग्ण होणार भरती
कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण ठेवले जातात. सध्या येथे १० रुग्ण आहेत. तर डीसीएचसीमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे असलेले गंभीर रुग्ण ठेवले जाणार आहेत. यासाठी येथे ५० बेडची व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे तालुक्यासह परिसरातील कोरोना रुग्णांसाठी स्थानिकस्तरावरच सोय होणार आहे.