पेंढरीला उपतालुका घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 00:07 IST2019-09-07T00:06:39+5:302019-09-07T00:07:33+5:30
दूर असलेल्या तालुकास्थळी जाऊन प्रशासकीय कामे करणे येथील नागरिकांना अशक्य होते. त्यामुळे पेंढरीला तालुक्याचा दर्जा देतपर्यंत किमान उपतालुक्याचा दर्जा देऊन नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी ठेवावा, तसेच इतर विभाग या ठिकाणी सुरू करावे, यासाठी लढा उभारण्याचे ठरविण्यात आले.

पेंढरीला उपतालुका घोषित करा
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : पेंढरी परिसरातील गावे धानोरा तालुका मुख्यालयापासून सुमारे ८० ते ९० किमी अंतरावर आहेत. एवढ्या दूर असलेल्या तालुकास्थळी जाऊन प्रशासकीय कामे करणे येथील नागरिकांना अशक्य होते. त्यामुळे पेंढरीला तालुक्याचा दर्जा देतपर्यंत किमान उपतालुक्याचा दर्जा देऊन नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी ठेवावा, तसेच इतर विभाग या ठिकाणी सुरू करावे, यासाठी लढा उभारण्याचे ठरविण्यात आले.
पेंढरी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात तालुका निर्माण कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. बैठकीला जि.प.सदस्य श्रीनिवास दुलमवार, पेंढरीचे सरपंच पवन येरमे, रूपेंद्र नाईक, अरूण शेडमाके, शत्रुघ्न येरमे, डोमाजी लेनगुरे, संतोष मंडल, उत्तम आतला, काशिनाथ आतला, माणिक हिचामी आदी उपस्थित होते.
पेंढरी तालुक्याची निर्मिती व्हावी, यासाठी फेब्रुवारी महिन्यात आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनानंतर किती समस्या मार्गी लागल्या व किती प्रलंबित आहेत, यावर विचार मंथन करण्यात आले. पेंढरी तालुका निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र तालुका निर्मितीस उशीर होऊ शकते. त्यामुळे किमान पेंढरीला उपतालुक्याचा दर्जा द्यावा. या ठिकाणी महसूल भवनाची इमारत आहे. या इमारतीचे लोकार्पण करून नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी, तसेच महत्त्वाचे विभाग या ठिकाणी ठेवावे. जेणेकरून महत्त्वाची कामे या कार्यालयात करता येऊन धानोरा येथे जावे लागणार नाही. यासाठी लढा उभारणे व पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.
१४ नोव्हेंबर रोजी संयुक्त गाव गणराज्य परिषद इलाक्याची जवळपास ५० गावांची झाडा येथे संयुक्त सभा घेतली जाणार आहे. या सभेत आंदोलनाची रूपरेषा ठरविली जाईल. जिल्हास्तरावर पाठपुरावा करून उपतालुका निर्मिती होईपर्यंत स्वस्त बसायचे नाही, असाही ठराव घेण्यात आला.