अभयारण्य घाेषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:44 IST2021-02-17T04:44:36+5:302021-02-17T04:44:36+5:30
गडचिरोली : टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे़ या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची ...

अभयारण्य घाेषित करा
गडचिरोली : टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे़ या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे़ शिवाय येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़
दिभना मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : वननाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे.
शहरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करा
आरमोरी : येथून गडचिरोलीला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोहझरी, वसा, देऊळगाव येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
शहरात डुकरांचा हैदोस वाढला
कुरखेडा : कुरखेडा शहरात डुकरांचा हैदोस प्रचंड प्रमाणात वाढला आहे. नगरपंचायतीचे परिसरातील डुकरांचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने सभोवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत. डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करून शहरातील डुकरांना हाकलून लावावे, अशी मागणी होत आहे.
सीमावर्ती भागातील गावे दुर्लक्षितच
गडचिरोली : छत्तीसगड, आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील औद्योगिक विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत मोठा उद्योग निर्माण न झाल्याने बेरोजगारी वाढली आहे.
पोर्ला विश्रामगृहाची दुरवस्था
पोर्ला : तालुक्यातील पोर्ला येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विश्रामगृह बांधण्यात आले, परंतु या विश्रामगृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विश्रामगृह दुरवस्थेत आहे. पोर्ला हे गडचिरोली तालुक्यातील मध्यवर्ती गाव आहे. येथील विश्रामगृह अतिशय जुने आहे. या विश्रामगृहाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.
सावरगाव परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष
धानोरा : छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरगाव परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहे. या ठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी नियमित कर्तव्य बजावत नाहीत. अनेक नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नाही, त्याबाबत जनजागृती करण्याची मागणी हाेत आहे.
भेंडाळा-आष्टी मार्गावर खड्डे कायम
भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. भेंडाळा-आष्टी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, या रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे. वारंवार तक्रार करूनही दुरूस्तीच्या कामाकडे कानाडोळा केला आहे.
गावांमध्ये निस्तार डेपो देण्याची मागणी
काेरची : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावात त्वरित निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. काेरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र येथे निस्तार डेपो नाही. परिणामी नागरिकांना जळाऊ लाकूड उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे.
मुख्य मार्गावर टॅक्सीचा हैदोस
गडचिराेली : येथील आरमोरी, धानोरा, चामोर्शी मार्गावरील बसथांब्याच्या परिसरात काळी-पिवळी टॅक्सी चालक रस्त्यावरच टॅक्सी लावत आहेत. या तिन्ही मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे महामंडळाच्या एसटीला प्रवासी घेण्यासाठी जागा उरत नाही.
शहरातील रस्त्यावर बांधकाम साहित्य
अहेरी : शहरात विविध भागात घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. शिवाय रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळाख आदी साहित्यही ठेवले आहे. मात्र याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे.