आलापल्लीत बस चालकाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: January 29, 2017 01:35 IST2017-01-29T01:35:22+5:302017-01-29T01:35:22+5:30
वादादरम्यान बस चालकाने मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू चंद्रपूरच्या

आलापल्लीत बस चालकाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू
वादातून घडली घटना : बस चालकावर गुन्हा दाखल
आलापल्ली : वादादरम्यान बस चालकाने मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू चंद्रपूरच्या रूग्णालयात नेताना वाटेतच झाला. सदर मारहाणीची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आलापल्ली बसस्थानकावर घडली.
बिल्ला उर्फ लक्ष्मीकांत पोशालू कोमट (३५) रा. वीर सावरकर चौक फारेस्ट कॉलनी वार्ड क्रमांक ६ आलापल्ली असे मृतक इसमाचे नाव आहे. तर या प्रकरणातील आरोपी बस चालकाचे नाव रूपराज संभाजी वानखेडे (४९) रा. नागपूर असे आहे.
शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एमएच ३३-०२१८ क्रमांकाची नागपूर-एटापल्ली ही राज्य परिवहन महामंडळाची बस आलापल्ली बसस्थानकावर उभी होती. या बसचा चालक रूपराज वानखेडे व आलापल्लीचा रहिवासी तथा झेरॉक्स व्यावसायिक लक्ष्मीकांत उर्फ बिल्ला कोमट या दोघांमध्ये वाद झाला.
बसचालक वानखेडे याने बिल्ला उर्फ लक्ष्मीकांत कोमट याच्या चेहऱ्यावर प्रहार केल्याने बिल्ला रोडवर मागच्या बाजूस खाली कोसळला. डोक्याच्या मागच्या बाजूस त्याला गंभीर दुखापत झाली. उपस्थित नागरिकांनी त्याला तत्काळ डॉ. चन्नी सलुजा यांच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर डॉ. सलुजा यांनी त्यांना चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला दिला. पुढील उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना वाटेतच बिल्ला उर्फ लक्ष्मीकांत यांचा मृत्यू झाला. त्याच्या अशा प्रकारच्या मृत्यूमुळे आलापल्लीत तणावपूर्ण शांतता होती.
शनिवारी आलापल्ली येथील बसस्थानक परिसरातील सर्व पानठेले, चहाटपरी व हॉटेल व्यावसायिकांनी बंद ठेवले होते. मृतक बिल्ला याचे आलापल्ली ग्रामपंचायतीच्या दुकान चाळीत झेरॉक्सचे दुकान आहे. मृतक बिल्लाच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, मुलगा व बहिणी आहेत. या घटनेची तक्रार मृतक बिल्ला उर्फ लक्ष्मीकांत याचा मामा दिलीप व्यंकटी गंजीवार यांनी अहेरी पोलीस ठाण्यात दाखल केली.
या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी भादंविचे कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास अहेरीचे पोलीस उपनिरिक्षक किरण बगाटे करीत आहेत. (प्रतिनिधी)