एकसारख्या क्रमांकाच्या पावत्या देऊन गैरव्यवहार
By Admin | Updated: October 25, 2016 00:56 IST2016-10-25T00:56:49+5:302016-10-25T00:56:49+5:30
येथे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात सारख्याच बुक क्रमांकाच्या..

एकसारख्या क्रमांकाच्या पावत्या देऊन गैरव्यवहार
ग्रा. पं. सदस्यांचा आरोप : दोन पावती बुक गहाळ
वैरागड : येथे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात सारख्याच बुक क्रमांकाच्या व सारख्या पावती क्रमांकाच्या तीन पावत्या वेगवेगळ्या व्यक्तींना देऊन रक्कम हडप केली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून ग्राम विकास अधिकारी डाखरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बावणकर, वसुधा तावेडे यांनी केली आहे.
२०१५-१६ या आर्थिक वर्षातील दोन पावती बूक डाखरे यांनी गहाळ करून लाखो रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. हा गैरव्यवहार लक्षात येऊ नये म्हणून नमूना ७, सामान्य पावती बुक वापरून एकाच बुकातील सारख्या नंबरच्या पावत्या वेगवेगळ्या व्यक्तींना दिल्या आहेत. बुक क्रमांक १ मधील क्रमांक ३ ची पावती ज्ञानेश्वर खोब्राजी पडघन यांना विद्युत नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ४०० रूपये नगदी घेऊन देण्यात आली आहे. बुक क्रमांक १ असे लिहिलेली नंबर ३ चीच पावती चिन्मय चित्तरंजन साना यांना हातपंप खोदण्यासाठी परवानगी देण्यासाठी ४०० रूपये नगदी घेऊन देण्यात आली आहे. तर याच क्रमांकाची तिसरी पावती गोरजाई माता यांनी ६ हजार रूपये जमा केले आहेत. त्यासाठी देण्यात आले आहेत. एकच पावती बुक, एकच पावती क्रमांक वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वापरून ग्रामविकास अधिकारी डाखरे यांनी लाखो रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. दोन पावती बुक गहाळ झाले असल्याचे चौकशीत सुद्धा स्पष्ट झाले आहे, असा आरोप केला आहे.
मागास क्षेत्र अनुदान निधीअंतर्गत येथील जिल्हा परिषद शाळेतील संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले. १२९ मीटर लांबीच्या संरक्षण भिंतीसाठी जास्तीत जास्त २० हजार विटा लागतात. मात्र या बांधकामात ३२ हजार विटा वापरल्याचे बिल जोडण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची तक्रार करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून ग्रामविकास अधिकारी डाखरे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बावनकर, वसुधा तावेडे यांनी केली आहे. (वार्ताहर)