Darbhanga Express will stop at Desaiganj | देसाईगंजात थांबणार दरभंगा एक्स्प्रेस
देसाईगंजात थांबणार दरभंगा एक्स्प्रेस

ठळक मुद्देदोन मिनिटांचा थांबा : चार वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : सिकंदराबाद-दरभंगा ही एक्स्प्रेस देसाईगंज येथील रेल्वेस्थानकावर १४ सप्टेंबरपासून थांबणार आहे. याबाबतचे पत्र रेल्वे विभागाने १३ सप्टेंबर रोजी काढले आहे. सदर एक्स्प्रेस देसाईगंज येथे थांबणार असल्याने रेल्वे प्रवाशांसाठी सोयीचे होणार आहे.
सिकंदराबाद-दरभंगा एक्सप्रेस गोंदिया-बल्लारशहा मार्गे जाते. सदर एक्स्प्रेसला देसाईगंज येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने केली जात होती. खासदार अशोक नेते यांनी रेल्वे मंत्रालयाला ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर रेल्वे विभागाने १३ सप्टेंबर रोजी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार सदर रेल्वे देसाईगंज येथे थांबणार आहे.
रेल्वेच्या वेळापत्रकानुसार दरभंगा-सिकंदराबाद (१७००८) एक्स्प्रेस देसाईगंज येथे बुधवारी व शनिवारी दुपारी १२.३८ ला पोहोचणार आहे. १२.४० ला प्रस्थान करेल. सिकंदराबाद-दरभंगा (१७००७) ही एक्सप्रेस रविवार व बुधवारी देसाईगंज रेल्वेस्थानकावर सकाळी ७.१७ पोहोचेल. ७.१९ वाजता प्रस्थान करेल.
दरभंगा एक्स्प्रेसच्या थांब्यासाठी खा.नेते यांच्यासह तत्कालीन रेल्वे सल्लागार समिती सदस्य डॉ. विष्णू वैरागडे, संजय गणवीर, नगराध्यक्ष शालू दंडवते, मोतीलाल कुकरेजा, राजेश जेठाणी यांनीही निवेदन दिले होते.


Web Title: Darbhanga Express will stop at Desaiganj
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.