अहेरी उपविभागात १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 17:20 IST2024-07-29T17:19:28+5:302024-07-29T17:20:25+5:30
१३२ घरे कोसळली : अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Damage to crops on 18 thousand hectares in Aheri sub-division
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने जिल्हाभर दाणादाण उडवली आहे. यामुळे सर्वाधिक हानी दक्षिण गडचिरोलीत झाली आहे. तब्बल १३२ घरे कोसळली, १६ जनावरे दगावली असून सुमारे १८ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाल्याची माहिती उजेडात आली आहे. जिल्ह्यात १८ जुलैपासून पाऊस सुरू आहे. २८ जुलै अखेरपर्यंत अहेरी उपविभागातील चार तालुक्यांत झालेल्या नुकसानीचा अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी आढावा घेतला.
गोसेखुर्द धरणातून वाढलेला विसर्ग व प्रमुख नद्यांना आलेला पूर यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. नदी- नाल्यांकाठच्या जमिनी पाण्याखाली गेल्या. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. भामरागडमधील पर्लकोटा नदीला महापूर आला असून पुलावरुन पाणी वाहत असल्याने शहराचा संपर्क तुटलेला आहे. परिसरातील शेकडो आदिवासी पाडे व गावांना जोडणारे नाले पाण्याखाली गेले आहेत. रस्ते, रपटे वाहून गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोठे किती नुकसान
तालुका क्षतीग्रस्त घरे मृत जनावरे
अहेरी ४० ०७
सिरोंचा ८६ ०६
एटापल्ली ०४ ०७
भामरागड ०२ ०१
पिकांचे नुकसान असे...
तालुका कापूस (हे.) धान (हे.)
अहेरी ३८६० २४७०
सिरोंचा ५७९९ १३१८
एटापल्ली ०० २७७०
भामरागड ०० १७१९
पीक विमा दावे नाकारु नका, अन्यथा कारवाई
यावेळी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडूनही आढावा घेण्यात आला. धान पिकाची भरपाई कंपनीकडून दिली जात नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी कुठल्याही स्थितीत शेतकऱ्यांना भरपाई नाकारु नका, त्यांचे दावे मंजूर करून योग्य ती भरपाई विनाविलंब अदा करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
पंचनामे करून अहवाल द्या
दरम्यान, अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांशी दूरभाष्यप्रणालीद्वारे संवाद साधून आढावा घेतला, यावेळी नैसर्गिक आपत्ती नियमावलीनुसार पंचनामे करुन झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.
"अहेरी उपविभागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. याशिवाय पीक विमा कंपनीलाही दावे नाकारू नयेत, अशी ताकीद दिली आहे. राज्य आपत्ती निवारण पथके तैनात आहेत. कोठेही अप्रिय घटना घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे. ३१ जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक पीक विमा काढावा."
- विजय भाकरे, अपर जिल्हाधिकारी अहेरी