बैलगाडीतून वरात काढण्याची प्रथा झाली लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:33 IST2021-03-15T04:33:04+5:302021-03-15T04:33:04+5:30

विसोरा : दोन मानवी जिवांचे मनोमिलन घडवून आणणारा एक सामाजिक उत्सव म्हणजे लग्न. लग्नात वर-वधू, कुटुंब, सगेसोयरे, शुभचिंतक, वऱ्हाडी ...

The custom of removing the bride from the bullock cart has disappeared | बैलगाडीतून वरात काढण्याची प्रथा झाली लुप्त

बैलगाडीतून वरात काढण्याची प्रथा झाली लुप्त

विसोरा : दोन मानवी जिवांचे मनोमिलन घडवून आणणारा एक सामाजिक उत्सव म्हणजे लग्न. लग्नात वर-वधू, कुटुंब, सगेसोयरे, शुभचिंतक, वऱ्हाडी या साऱ्यांशिवाय बैलजोडी आणि बैलगाडी यांचीही उपस्थिती अगदी प्रार्थनीय अशीच. याला कारणही तसेच. लग्नाचा केंद्रबिंदू असलेल्या नवरदेव, नवरीच्या वरातीची सारी भिस्त आणि आरास असायची बैलगाडीवर. मात्र, मानवी बुद्धी आणि कल्पनेच्या तंत्रयंत्र बळावर अवतरलेल्या चारचाकी वाहनांनी बैलगाडीने निघणारी नवरदेवाची वरात पार बंद झाली आहे. चारचाकी वाहनांमुळे दोन-तीन दशकांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येकच लग्नाची बैलगाडीतून काढली जाणारी वरातीची प्रथा आज लुप्त होत चालली आहे.

लग्न जुळल्यावर वर-वधू आणि सर्वांनाच ओढ असते ती लग्नाची. एकदा लग्नाचा दिवस आला की, उत्कंठा अगदी शिगेला पोहोचते. प्रत्येक समाजाच्या प्रथेनुसार लग्न हे वर किंवा वधू माता-पित्याच्या राहत्या घरी असते. त्यामुळे लग्न होताच वर किंवा वधू आणि त्यांच्याकडील वऱ्हाड वर किंवा वधूच्या घरी आपल्या लवाजम्यासह जाते. हीच लग्नाची वरात. पूर्वी ग्रामीण भागात दुचाकी, चारचाकी वाहने असणे दुर्मीळच. त्यामुळे लग्नाच्या वरातीमधील वर-वधू, वऱ्हाडींना जाण्या-येण्याकरिता बैलगाडी, रेंगी, खासर, दमणी हेच एकमेव साधन. वर-वधूंच्या घरी तसेच शेजारी, मोहल्ल्यातील, गावातील तसेच लग्नाला आलेल्या नातलगांच्या मालकीच्या बैलगाड्यांवर वर किंवा वधू आणि लग्नाला आलेले वऱ्हाडी बसून जात वा येत. यात वर किंवा वधूकरिता सजविलेली देखणी बैलजोडी आणि बैलगाडी असायची. गावात कुणाच्या घरी लग्न असले की, लग्नाच्या वरातीत जाण्यासाठी बैलजोडी आणि बैलगाडी असलेल्या घरचे लग्नदिवसाच्या आधीच सर्व तयारी करायचे. ज्या गावी लग्न आहे, ते ठिकाण गावापासून नेमके किती मैलावर आहे यावरून आधीच लग्नघरचे आणि लग्नाला जाणारे सारेच नियोजन करायचे. कोण कोण लग्न वरातीला येणार, किती बैलजोड्या लागणार तशी पूर्ण व्यवस्था केली जात असे. मग बैलजोडीला सजविणे, बैलगाडी, खाचर सुव्यवस्थित करणे आणि लग्न ज्या गावी आहे तिथे जाण्यासाठी किती वेळ लागेल यावरून बैलगाडीवर लग्न वरात निघायची. लग्नाची वरात लग्नघरच्या कुलदैवताची पूजापाठ झाली की त्यानंतर गावातील हनुमान मंदिरात नतमस्तक झाल्यावर निघायची. ही वरात अगदी खास आणि आगळीवेगळी अशी असायची. आताच्या चारचाकी वाहनांनी निघणाऱ्या लग्न वरातीत बैलगाडीने निघणाऱ्या वरातीमधील मजा नसल्याचे जाणकार सांगतात. आज वयाची पन्नाशी ओलांडलेल्या बहुतांश जोडप्यांची लग्न वरात बैलगाडीने काढली असल्याचे सांगतात. लग्नातील नवरदेव-नवरी यांची वरात जेव्हा निघायची, तेव्हा बैलगाड्यांचा ताफा गावातल्या गल्लोगल्ली सजायचा आणि एकदा त्या-त्या बैलगाडीवर वऱ्हाडी बसले की एका लांबच लांब रांगेत लग्नाची वरात निघायची. या वरातीतील प्रत्येक क्षण अविस्मरणीय असाच असायचा, असे बैलगाडीतून वरात गेलेल्या तेव्हाचे वर-वधू, वऱ्हाडी सांगतात. वरातीच्या मार्गात बैलांना तहान लागल्यास वाटेत पडणाऱ्या तलाव, बोड्यामधील पाणी पाजले जात असे. पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत लग्नगावी वरात न पोहोचल्यास वाटेतील एखाद्या गावत वरातीतील वऱ्हाड मुक्कामी असायचे किंवा पाच-पन्नास बैलगाड्यांचा ताफा आणि शेकडो वऱ्हाडी असल्याने रात्रभरसुद्धा वरातीचा प्रवास सुरूच असायचा; परंतु बैलांना विश्रांती म्हणून पाणवठ्यावर वरात काही वेळ थांबा घेत असे. यातून लग्नातील सहकार्य, सार्वमत आणि संकटाला धावून जाण्याची वृत्ती दिसून येत हाेती.

बाॅक्स

काेराेनामुळे लग्नाच्या आनंदावर पुन्हा विरजण

पूर्वीच्या लग्नांचे कार्यक्रम चार ते पाच दिवस चालत हाेते. आता एक दिवसातच लग्न उरकले जाते. त्यातच मागील वर्षीपासून तर काेराेनामुळे लग्नात उपस्थित पाहुण्यांच्या संख्येवरच बंधने घालण्यात आली आहेत. तसेच अगदी साधेपणाने कार्यक्रम उरकले जात आहेत. त्यामुळे लग्नांवर हाेणारा अवाढव्य खर्च कमी झाला आहे. मात्र, लग्नाचा आनंद कमी झाला आहे. अनेकांचा राेजगारही हिरावला गेला आहे.

दिवसेंदिवस बैल आणि बैलगाड्या कमी होत आहेत. त्यामुळे बैलगाडीतून काढली जाणारी नवरदेव-नवरीची वरात लुप्त होत आहे. त्यातच आजपासून एक वर्षापूर्वी प्रथमच आणि आता पुनश्च आलेल्या कोरोनाने लग्न कार्यावर नको तितके निर्बंध लादल्याने लग्न पाहावे करून असे म्हणण्याची वेळ सर्वांवर येऊन ठेपली आहे. तेव्हा नेमक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकले जात आहे.

Web Title: The custom of removing the bride from the bullock cart has disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.