वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान

By Admin | Updated: August 15, 2016 00:46 IST2016-08-15T00:46:55+5:302016-08-15T00:46:55+5:30

गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागुन आहेत. वन्यप्राणी शेतामध्ये शिरून पिकांचे नुकसान करीत असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Crop damage from wild animals | वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान

आष्टी परिसरातील शेतकरी त्रस्त : बंदोबस्त करण्याची मागणी
आष्टी : गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलाला लागुन आहेत. वन्यप्राणी शेतामध्ये शिरून पिकांचे नुकसान करीत असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
आष्टी परिसरातील शेतकरी धानपिकाचे उत्पादन घेतात. तर काही शेतकरी धानाच्या पाऱ्यांवर तसेच बांधीमध्ये भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतात. पावसाळ्यामध्ये या परिसरातील शेतकरी शेतामध्ये भेंडी, कारले, चवळीच्या शेंगा, काकडी आदी पिकांचे उत्पादन घेतात. अनेक शेतकऱ्यांचे शेत जंगलाला लागुन आहेत. जंगलातील रानडुक्कर, हरीण व इतर वन्यजीव शेतामध्ये येवून भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान करीत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्रीच्या सुमारास जागल राहणेसुद्धा शेतकऱ्यांना शक्य होत नाही. काही शेतकऱ्यांचा भाजीपाला जंगली प्राण्यांनी फस्त केला असल्याने उत्पादन खर्चही भरून निघणे अशक्य झाले आहे. भाजीपाला पिकाबरोबरच पाळीवर लावलेले तूर, पोपट आदी पिकांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. वन्य जीवांच्या हैदोसामुळे काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पीक लावणे सुध्दा बंद केले आहे. वन्य जीवांकडून शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान होत असल्यास पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वन विभागावर आहे. शेतकऱ्यांनी सदर बाब वन विभागाला कळविली आहे. वन विभागाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crop damage from wild animals