...तर कुटुंबासह आत्मदहन करणार; पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा
By गेापाल लाजुरकर | Updated: October 5, 2023 15:58 IST2023-10-05T15:58:16+5:302023-10-05T15:58:35+5:30
रानटी हत्तींकडून पिकांचे नुकसान : वनविभागाकडून तुटपुंज्या मदतीचा आरोप

...तर कुटुंबासह आत्मदहन करणार; पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव हलबी येथील शेतकऱ्यांच्या धानपिकांची नासधूस रानटी हत्तींच्या कळपाने केली. उभे पीक नष्ट झाले. लाखोंचे पीक नष्ट झाले असतानाही अत्यल्प व तुटपुंजी आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. ही गंभीर बाब असून, पीक नुकसानीच्या प्रमाणात एकरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अन्यथा संपूर्ण कुटुंबासह सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार, असा इशारा पिंपळगाव हलबी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गुरूवारी देसाईगंज तहसीलदारांमार्फत शासन-प्रशासनाला निवेदनातून दिला.
निवेदनात म्हटले आहे की, २२ सप्टेंबर २०२३ पासून ८ ते १० दिवस रानटी हत्तींचा कळप हलबी पिंपळगाव शेतशिवार परिसरात होता. दरम्यान, हत्तींनी उभ्या पिकात हैदाेस घालून शेतकऱ्यांच्या हाती येणारे धानपीक नष्ट केले. शासनाने झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात किमान ५० हजार रुपये प्रतिएकर तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, कुटुंबासह सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार, असा इशारा दिला. निवेदन प्रभारी तहसीलदार गेडाम यांनी स्वीकारले. निवेदन देताना श्रावण पत्रे, कृष्णा भोयर, आबाजी बगमारे यांच्यासह पीक नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
लागवड खर्च २५ हजारांवर
लागवडीचा खर्च जवळपास २५ हजार रुपये प्रतिएकर असला तरी शासकीय स्तरावरून तुटपुंजी व अल्प मदत देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. ते देखील कधी मिळेल, याची देखील शाश्वती नाही. त्यामुळे जगायचे कसे? कशाच्या भरवशावर पोट भरायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे