कोरची रूग्णालय सलाईनवर
By Admin | Updated: July 2, 2014 23:19 IST2014-07-02T23:19:03+5:302014-07-02T23:19:03+5:30
येथील रूग्णालयात मंजूर असलेल्या २३ पदांपैकी सुमारे १२ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या रूग्णालयात इतर सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिल्या

कोरची रूग्णालय सलाईनवर
शालिकराम कराडे - कोरची
येथील रूग्णालयात मंजूर असलेल्या २३ पदांपैकी सुमारे १२ पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या रूग्णालयात इतर सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिल्या जात आहे. त्यामुळे कोरची तालुक्यातील जनता बरीच त्रस्त झाली आहे. या ठिकाणची पदे भरण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कोरची हा गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वात शेवटी अगदी उत्तरेला असलेला तालुका आहे. या तालुक्यातील सर्वच गावे दुर्गम भागात मोडत असून नक्षलग्रस्त आहेत. कोरची तालुक्यात लोकसंख्या विरळ आहे. खासगी दवाखानेही तालुकास्थळ वगळता एकाही गावी नाही. त्यामुळे नागरिकांना शासकीय रूग्णालयातूनच उपचार घ्यावा लागतो. कोरची येथे असलेल्या ग्रामीण रूग्णालयावर संपूर्ण तालुक्याच्या आरोग्याची जबाबदारी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात आलेले बहुतांश रूग्ण ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठविले जातात. मात्र याही रूग्णालयाची अत्यंत दुर्दशा झाली आहे.
रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाचे एक पद मंजूर असून ते पद भरले आहे. वैद्यकीय अधिकारी वर्गाची ३ पदे भरली आहेत. परिचारिकेची ७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४ पदे रिक्त आहेत. २ कनिष्ठ लिपिकापैकी १ पद रिक्त आहे. वॉर्ड बॉयचे ४ पद रिक्त आहेत. लॅब टेक्निशिअन व औषधी निर्माण अधिकाऱ्याचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे.
ग्रामीण रूग्णालयावर संपूर्ण तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा भार आहे. या रूग्णालयात स्त्री रूग्णांची व बाल रूग्णांचेही प्रमाण दिवसेंंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे स्त्रिरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञाची नितांत गरज आहे. मात्र दोन्ही पदे या रूग्णालयात मंजूर नाहीत. त्यामुळे भरण्याचा प्रश्नच नाही. एकूण २३ कर्मचाऱ्यांचे पदे मंजूर आहेत. त्यापैकी १२ पदे रिक्त आहेत. म्हणजेच जवळपास निम्मे पदे रिक्त आहेत. निम्म्या कर्मचाऱ्यांना रूग्णालयाचा भार सांभाळावा लागत आहे. रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे आरोग्य सेवा देतांना उपलब्ध कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक उडत आहे.
रूग्णालयात रिक्त पदांबरोबरच आरोग्य सुविधांचेही वाणवा असल्याचे दिसून येते. पुरेशा साधनसामुग्री अभावी या ठिकाणी भरती झालेल्या रूग्णाला सरळसरळ गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला दिला जातो. गडचिरोली ते कोरचीचे अंतर १०० किमी पेक्षाही जास्त आहे. ग्रामीण भागातील नागरिकाला गडचिरोली येथे राहण्याचा खर्च झेपत नाही. तरीही नाईलाजास्तव उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे रूग्णालयातील पदे भरण्याची मागणी होत आहे.