गडचिरोलीतील समस्या मार्गी लावा
By Admin | Updated: May 24, 2017 00:36 IST2017-05-24T00:36:14+5:302017-05-24T00:36:14+5:30
गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पाणीपुरवठयाच्या तसेच अन्य मूलभूत सुविधा मार्गी लावण्यात याव्या, ...

गडचिरोलीतील समस्या मार्गी लावा
निवेदन सादर : जि.प., न.पं. पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पाणीपुरवठयाच्या तसेच अन्य मूलभूत सुविधा मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी जिल्हा परिषद व पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर व गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी गडचिरोली शहर व जिल्ह्यातील विविध समस्यांसंदर्भात पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेंतर्गत वाढीव पाईपलाईनची गरज आहे. विसापूर वॉर्डातील पाणी समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी या वॉर्डात जलकुंभ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, भूमिगत गटार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, गोदरीमुक्त शहरासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी विकासाच्या अनेक बाबींवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी नगर पालिकेचे पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे उपस्थित होते. गडचिरोली शहराच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.