राज्यभर महामंडळ गोदाम बांधणार
By Admin | Updated: January 16, 2016 01:49 IST2016-01-16T01:49:56+5:302016-01-16T01:49:56+5:30
गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडून १८ लाख क्विंटल धान्याची खरेदी केली जाते.

राज्यभर महामंडळ गोदाम बांधणार
विष्णू सावरा यांची घोषणा : आरमोरी व गडचिरोलीत नवीन गोदामाचे उद्घाटन
आरमोरी/गडचिरोली : गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाकडून १८ लाख क्विंटल धान्याची खरेदी केली जाते. मात्र धान्य साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे मागील काळात महामंडळाला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. याबाबीचा गांभीर्याने विचार करून राज्यभर गोदाम बांधण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केले.
सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक अंतर्गत प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने आरमोरी व गडचिरोलीनजीकच्या नवेगाव येथे गोदाम बांधण्यात आले. याचे उद्घाटन ना. सावरा यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, स्वप्नील वरघंटे, आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव, महाव्यवस्थापक मांदाळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, खासदार अशोक नेते यांनीही मार्गदर्शन केले. संचालन एस. एस. आचला, आभार विवेक कुंभार यांनी मानले. जिल्ह्यातील कार्यक्रम असूनही आदिवासी विकास राज्यमंत्री व पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याची चर्चा सर्वत्र होती. (वार्ताहर)