आणखी दोन जणांचा कोरोनाबळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST2020-09-20T05:00:00+5:302020-09-20T05:00:32+5:30
गडचिरोलीतील १६ जणांमध्ये सेमाना मार्गावरील एक जण, नवेगावमधील दोघे, रामपुरी वार्डातील एक जण, हनुमान वॉर्डातील एक, रामनगर येथील एक, कॅम्प भागातील एक, कन्नमवार वार्डातील एक, आयटीआय चौकातील एक, शिवाजीनगर येथील दोघे, वार्ड नंबर १५ मध्ये माहुर (जि.नांदेड) येथून आलेली एक व्यक्ती आदींचा समावेश आहे.

आणखी दोन जणांचा कोरोनाबळी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली. गडचिरोली आणि आरमोरी येथील प्रत्येक एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १० वर पोहोचली आहे. दरम्यान २८ नवीन रुग्णांची भर पडली असली तरी ५४ जणांनी एकाच दिवशी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली.
मृतांमध्ये गडचिरोलीच्या गोकुळनगर येथील एकाचा समावेश आहे. तो रुग्ण हृदयरोगाने ग्रस्त होता तर दुसरा आरमोरीच्या शंकरनगरातील रहिवासी होता.
कोरोनामुक्त झालेल्या त्या ५४ रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील २१ जणांचा समावेश आहे. याशिवाय चामोर्शीमधील १३, धानोरा १०, अहेरी ३, आरमोरी १, कोरची १, कुरखेडा १, मुलचेरा १ आणि वडसा येथील ३ जणांचा समावेश आहे. नवीन २८ बाधितांमधे गडचिरोली १६, चामोर्शी ७, मुलचेरा १ व अहेरी ४ अशा २८ जणांचा समावेश आहे.
गडचिरोलीतील १६ जणांमध्ये सेमाना मार्गावरील एक जण, नवेगावमधील दोघे, रामपुरी वार्डातील एक जण, हनुमान वॉर्डातील एक, रामनगर येथील एक, कॅम्प भागातील एक, कन्नमवार वार्डातील एक, आयटीआय चौकातील एक, शिवाजीनगर येथील दोघे, वार्ड नंबर १५ मध्ये माहुर (जि.नांदेड) येथून आलेली एक व्यक्ती आदींचा समावेश आहे. चामोर्शी येथील ७ जणांमध्ये आष्टी येथील सहा जण, किष्टापूर येथील एक जण, मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथील एक जण, अहेरी येथील चार, तसेच देचलीपेठा येथील एक, आलापल्ली येथील दोघे आणि मरपल्ली येथील एक जणाचा समावेश आहे. अशा प्रकारे शनिवारी नवीन २८ जण कोरोनाबाधित आढळून आले.
आता जिल्ह्यातील एकूण क्रियाशिल बाधितांची संख्या ५३७ झाली आहे. आतापर्यंत १९२४ बाधित रुग्णांपैकी १३७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
न.प.कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
गडचिरोलीत मृत पावलेल्या वृद्ध महिलेवर कठाणी नदीतीरावरील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णावर अंत्यसंस्कार करताना नातेवाईकही सोबत राहू शकत नाही. त्यामुळे नगर परिषदेचे सहायक अग्निशमन अधिकारी अनिल गोवर्धन, राजेश मधुमटके, आनंद सोनटक्के, विनोद लटारे, अंकित मधुमटके, नितेश गजभिये, भाऊराव उंदिरवाडे आणि वाहनचालक मुझाहिद पठाण आदींनी अंतिम सोपस्कार पूर्ण केले. अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणून मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग आदी नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहन न.प.मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी केले.