रुग्णवाहिकेअभावी कोरोनाचा रुग्ण सहा तास ताटकळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST2021-03-29T04:22:18+5:302021-03-29T04:22:18+5:30
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने येथील कोविड सेंटर डिसेंबर महिन्यात बंद करण्यात आले. त्यामुळे कोरोनाच्या सर्व रुग्णांना ...

रुग्णवाहिकेअभावी कोरोनाचा रुग्ण सहा तास ताटकळत
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने येथील कोविड सेंटर डिसेंबर महिन्यात बंद करण्यात आले. त्यामुळे कोरोनाच्या सर्व रुग्णांना आता गडचिरोली येथे पाठवण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयात दररोज सकाळी ११ वाजता तपासणी केली जाते. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी रुग्णांची तपासणी केली असता एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गडचिरोली येथील ॲम्बुलन्स प्रमुखांना ११.३० वाजता रुग्णाची माहिती देऊन वाहनाची मागणी केली. त्यांनी रुग्णांची माहिती घेतली व वाहन पाठवतो असे सांगितले; परंतु अनेकदा फोन करूनही वाहन लवकर आले नाही. ११ वाजेपासून रुग्णवाहिकेअभावी तो रुग्ण रुग्णालयाच्या आवारात ताटकळत असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली. प्रतिनिधीने रुग्णालयाला भेट देऊन विचारपूस केली असता धानोरा येथील सीआरपीएफ कॅम्पमधील एका ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयाच्या आवारात बसून राहण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे जेवणसुद्धा झाले नव्हते. त्यांच्याजवळ कोणीही जात नव्हते.
सदर रुग्णाने भूक लागल्यानंतरही बाहेर न पडण्याचे सौजन्य दाखविले. अन्यथा ते बाहेर गेले असते तर कोरोना पसरण्याची शक्यता होती. या अगोदरही असे प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. कोरोना रुग्णांकडे आरोग्य विभागाकडून अशा प्रकारचे दुर्लक्ष होत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, आणि असा प्रकार यापुढे होऊ नये यासाठी धानोरा येथे कोविड केअर सेंटर देण्यात यावे किंवा धानोरा येथे रुग्णवाहिकेची सोय करावी, अशी मागणी होत आहे.