कोरोनाने पालकांचे छत्र गमावलेल्या मुलांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST2021-05-26T04:36:36+5:302021-05-26T04:36:36+5:30
अल्पवयीन मुलांना पालकांच्या भावनिक आधाराची नितांत गरज असते. कोरोनासारख्या आजाराने अचानक आई किंवा वडिलांचा मृत्यू होण्यामुळे त्यांच्या मुलांना अनेक ...

कोरोनाने पालकांचे छत्र गमावलेल्या मुलांना आधार
अल्पवयीन मुलांना पालकांच्या भावनिक आधाराची नितांत गरज असते. कोरोनासारख्या आजाराने अचानक आई किंवा वडिलांचा मृत्यू होण्यामुळे त्यांच्या मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात कमावते पालक गेल्यास पालनपोषणासाठी येणारा खर्च कोण आणि कसा भागवणार असाही प्रश्न निर्माण होतो. अशा स्थितीत मुलांचे शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाह भागवण्यासाठी शासनाकडून त्यांचे पालकत्व घेऊन आवश्यक ती मदत केली जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांचा शोध आरोग्य विभाग आणि तालुकास्तरीय यंत्रणेमार्फत घेतला जात आहे.
(बॉक्स)
आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास ११०० रुपयांची मदत
- बाल संगोपन योजनेंतर्गत कोणत्याही कारणाने आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या १८ वर्षापर्यंतच्या मुलांना आता दरमहा ११०० रुपयांची मदत केली जाणार आहे.
- आतापर्यंत ही मदत ४२५ रुपये महिना अशी होती. मात्र आता सुधारित शासन आदेश काढून त्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
- एचआयव्ही, कॅन्सरसारखे दुर्धर आजार किंवार कैदी, विधवा महिलांची १८ वर्षाखालील मुले यांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.
१०- कोरोनाने आईबाबा हिरावलेल्यांची संख्या
मुले- ४, मुली - ६
आई किंवा बाबा नसणाऱ्या मुलांचे सरकार काय करणार...
१) आई किंवा बाबा गमावलेल्या मुलांचा सांभाळ करण्यास इतर नातेवाईक तयार असतील तर त्यांच्या रेशनची व्यवस्था म्हणून विशिष्ट रक्कम दिली जाईल.
२) आईबाबा असे दोन्ही पालक नसेल त्यांच्यासाठी बालगृहात राहण्याची व्यवस्था केली जाईल. मुलींसाठी घोट येथे बालगृह आहे.
३) ० ते ६ वयोगटातील अनाथ झालेल्या बालकांना शिशुगृहात ठेवले जाईल. गडचिरोलीत शिशुगृह नसल्याने त्यांना चंद्रपूरच्या शिशुगृहात पाठविले जाईल.
कोट
बाल संगोपन योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या ६०० बालकांना लाभ दिला जात आहे. आता कोरोनाने मृत्यू होणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी नव्याने मार्गदर्शक सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार अशा मुलांचा शोध घेतला जात आहे.
- नारायण परांडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी