जिल्हा परिषदेत चेंबरवरून वादंग

By Admin | Updated: December 15, 2015 03:39 IST2015-12-15T03:39:07+5:302015-12-15T03:39:07+5:30

जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वास भोवते व जिल्हा परिषदेत आठ दिवसांपूर्वीच रूजू झालेले

The controversy over the Chamber of Zilla Parishad | जिल्हा परिषदेत चेंबरवरून वादंग

जिल्हा परिषदेत चेंबरवरून वादंग

गडचिरोली : जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वास भोवते व जिल्हा परिषदेत आठ दिवसांपूर्वीच रूजू झालेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर यांनी एकाच चेंबरवर हक्क सांगितल्याने अधिकारी व पदाधिकारी यांच्यामध्ये वाद उफाळून आला.
जिल्हा परिषद इमारतीच्या तळमजल्यावर उजव्या बाजुला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र चेंबर बनविण्यात आला आहे. लाखो रूपये खर्चून सदर चेंबरची एक वर्षांपूर्वी दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र मागील अनेक महिन्यांपासून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पद रिक्त होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे विद्यमान सभापती विश्वास भोवते यांनी त्या चेंबरमध्ये बसण्यास सुरूवात केली. सभापती बनल्यापासून ते त्याच चेंबरमध्ये बसत होते. आठ दिवसांपूर्वी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जवळेकर जिल्हा परिषदेत रूजू झाले.
विश्वास भोवते राहत असलेला चेंबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आहे, ही बाब कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जवळेकर यांना सांगितली. त्यानुसार जवळेकर यांनी विश्वास भोवते यांच्या नावाची पाटी तीन दिवसांपूर्वीच काढायला लावली. त्याचबरोबर येथील सामानही काढण्याची तयारी सुरू केली होती. ही बाब विश्वास भोवते यांना माहित पडली. त्यांनी जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पेंदोर यांना बोलावून आपण त्याच चेंबरमध्ये राहणार असल्याचा दम भरला. त्याचबरोबर आपल्या परवानगीशिवाय पाटी कशी काय काढण्यात आली असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला. मात्र वाद चिघळू नये यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जवळेकर यांनी मागार घेत आपण दुसऱ्या चेंबरमध्ये बसण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर काही वेळाने कर्मचाऱ्यांनी विश्वास भोवते यांच्या नावाची पाटी चेंबरवर लावली.
विश्वास भोवते यांच्या नावाची पाटी काढल्यापासूनच कोण कोणत्या चेंबरमध्ये बसणार या विषयी कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये चर्चेचा मुद्दा बनला होता. मात्र जवळेकर यांनी मोठेपणा दाखवत स्वत:चा चेंबर विश्वास भोवते यांना बसण्यासाठी दिल्याने चर्चेलाही पूर्णविराम मिळाला. (नगर प्रतिनिधी)

समाजकल्याण सभापती विश्वास भोवते राहत असलेला चेंबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठीच बनविण्यात आला होता. तो चेंबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावानेच आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे पद रिक्त होते. त्यामुळे सदर चेंबर रिकामा होता. त्यामुळे या चेंबरमध्ये समाजकल्याण सभापती बसत होते. जवळेकर रूजू झाल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार विश्वास भोवते यांच्या नावाची पाटी तीन दिवसांपूर्वी काढली. भोवते यांनी त्याच चेंबरमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर जवळेकर यांच्यासाठी दुसरा चेंबर बनविण्यात आला आहे.
- आर. एल. पेंदोर, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जि. प.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा चेंबर रिकामा असल्याने त्या चेंबरमध्ये बसत होतो. जवळेकर रूजू झाल्यानंतर आपण चेंबर सोडण्यास तयार होतो. मात्र सर्व सोयीसुविधांनीयुक्त चेंबर असावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. जवळेकर यांनी दुसऱ्या चेंबरमध्ये बसण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे हा वाद आता मिटला आहे.
- विश्वास भोवते, समाजकल्याण सभापती,जिल्हा परिषद गडचिरोली.

Web Title: The controversy over the Chamber of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.