लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेने शासनाची परवानगी घेऊन सप्टेंबर २०२४ मध्ये कंत्राटी तत्त्वावर अर्हताधारकांची नियुक्ती जि.प. शाळांमध्ये केली. मात्र, गत आठ महिन्यांच्या कालावधीत या कंत्राटी शिक्षकांना केवळ दीड महिन्याचे मानधन दिलेले आहे. साडेसहा महिन्यांचे मानधन अजूनपर्यंत दिलेले नाही.
२०२२ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविली; परंतु जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांकरिता अर्हताधारक उमेदवार उपलब्ध न झाल्याने येथे पदभरती होऊ शकली नाही. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर झाला. याच वेळी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार युवांना संधी देण्यात आली. तरीसुद्धा शिक्षकांची पदे रिक्त होती. या जागी कंत्राटी शिक्षक नियुक्त केले.
नियमित शिक्षक 'सुगम'मध्ये; कंत्राटींची बदली दुर्गम भागातकंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या शिक्षकांना स्थानिक स्तरावर काम करणे परवडणारे होते; परंतु जेव्हा अवघड क्षेत्रातील नियमित शिक्षकांची सुगम क्षेत्रात बदली झाली तेव्हा मानधन तत्त्वावरील कंत्राटी शिक्षकांना दुसऱ्या तालुक्यांत म्हणजे भामरागड, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, कोरची, एटापल्ली यांसारख्या दुर्गम भागात पाठविण्यात आले. यांना १५ हजार रुपये मानधनात काय परवडणार, असा सवाल आहे. दुर्गम भागात बदली झालेल्या कंत्राटी शिक्षकांना आर्थिक अडचणी आहेत.
५६९ कंत्राटी शिक्षकाचा मान मिळाला, धन केव्हा ?शिक्षक जिल्ह्याच्या जि.प. शाळांमध्ये कार्यरत आहेत. इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता सहावी ते आठवीला ते अध्यापन करीत आहेत.
मानधन १५ हजार, तेसुद्धा अनियमित
- कंत्राटी शिक्षकांना १५ हजार रुपये मानधन प्रतिमहिना दिले जाते. सदर मानधनसुद्धा नियमित मिळत नसल्याने या शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.
- आधीच कमी मानधन त्यातही ते अनियमित मिळत नसल्याने कंत्राटी शिक्षकांना दुसऱ्यांकडून उसनवार घ्यावे लागते.
- अनेक कंत्राटी शिक्षक दुसऱ्याकडून कर्ज काढल्याने त्यांचे आर्थिक बजेट बिघडून ते कर्जबाजारी झाले आहेत.
दिवाळीनंतर दिले दीड महिन्याचे मानधनकंत्राटी शिक्षकांची नियुक्ती सप्टेंबर २०२४ मध्ये झाल्यानंतर शासनाकडून निधी प्राप्त झाला. तेव्हा दोन महिन्यांनंतर दीड महिन्याच्या अध्यापन कामाचा मोबदला देण्यात आला. दीड महिन्यांचे मानधन तेसुद्धा दिवाळी सणानंतर देण्यात आले होते.
"दुसऱ्या गावात अध्यापन करताना प्रवास खर्च किंवा निवास खर्च येतो. हा खर्च भागविणे कठीण होते. शासनाने कंत्राटी शिक्षकांना नियमित मानधन द्यावे."- कमलाकर सहारे, कंत्राटी शिक्षक
"शासनाने बेरोजगारांना शिक्षक बनण्याची संधी दिली; पण मानधन नियमित मिळत नाही. सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या कंत्राटी शिक्षकांनी उपजीविका कशावर चालवायची."- कांचन भरणे, कंत्राटी शिक्षिका