२५ ग्रा.पं.त दूषित
By Admin | Updated: June 29, 2015 01:58 IST2015-06-29T01:58:12+5:302015-06-29T01:58:12+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतीच्या गावात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे ....

२५ ग्रा.पं.त दूषित
पाणी गुणवत्तेला खो : १५९ ग्रा.पं.ना पिवळे कार्ड वाटप
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ४५६ ग्रामपंचायतीच्या गावात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पावसाळ्यापूर्वी एप्रिल महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे तीव्र जोखमीचे ६९ स्त्रोत आढळून आले. या गावांमध्ये नागरिक दूषित पाणी पित आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पावसाळ्यात अस्वच्छता व दुषीत पाण्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमध्ये साथीच्या रोगाची लागण होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणी गुणवत्तेबाबत खबरदारी घ्यावी, या उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने वर्षातून दोनदा गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येते. पावसाळ्यापूर्वी एकदा व पावसाळ्यानंतर दुसऱ्यांदा पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण केले जाते. जिल्ह्यात दुषीत पाण्यापासून साथीच्या रोगाची लागण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागावतीने पावसाळ्यापूर्वी एप्रिल महिन्याच्या अखेरीस ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व गावातील पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ३५ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये तीव्र जोखमीचे पाण्यााचे तब्बल ६९ स्त्रोत आढळून आले. १५९ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये मध्यम जोखमीचे एकूण ४ हजार ४८४ स्त्रोत आढळून आले. तर २८३ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये ६ हजार ८४२ सौम्य जोखमीचे स्त्रोत आढळून आले. तीव्र जोखमीचे स्त्रोत आढळून आलेल्या २५ ग्रामपंचायतीमध्ये देसाईगंज, कुरखेडा, चामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा पंचायती समितीतील एका ग्रामपंचायतीच्या गावांचा समावेश आहे. तर भामरागड व अहेरी तालुक्यात प्रत्येकी नऊ ग्रा.पं.च्या गावांमध्ये तीव्र जोखमीचे स्त्रोत आढळून आले. या २५ ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाच्या वतीने लाल कार्ड देण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
अनेक ग्रामपंचायती उदासीन
पावसाळ्याचे दिवस सुरू होऊनही जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताच्या परिसरात स्वच्छता केली नाही. तसेच ब्लिचिंग पावडरही टाकले नाही. त्यामुळे नागरिकांना दुषीत पाणी प्यावे लागत आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जि.प. गडचिरोलीच्या वतीने २५ मे ते २५ जून २०१५ या कालावधीत साथरोग मुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मात्र अनेक ग्रामपंचायतीकडून गुणवत्तापूर्ण व शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.