ग्राम पंचायतींचे बांधकाम रखडले
By Admin | Updated: March 24, 2015 01:46 IST2015-03-24T01:46:47+5:302015-03-24T01:46:47+5:30
राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १४ ग्राम पंचायत इमारतीच्या बांधकामाला

ग्राम पंचायतींचे बांधकाम रखडले
गडचिरोली : राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात १४ ग्राम पंचायत इमारतीच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. व त्याचा काही प्रमाणात निधीही प्राप्त झाला. मात्र उर्वरित निधी प्राप्त न झाल्याने या ग्राम पंचायतीच्या इमारतींचे बांधकाम रखडले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६५ ग्राम पंचायती आहेत. यातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्राम पंचायती नक्षलप्रभावीत भागामध्ये येतात. नक्षल्यांचा लोकशाहीस विरोध आहे. त्यामुळे लोकशाहीचा एक महत्वाचा भाग असलेल्या ग्राम पंचायतीलाही नक्षल्यांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. परिणामी आजपर्यंत अनेक ग्रामपंचायतींची जाळपोळही झाली आहे.
गावाच्या विकासाचे केंद्र असलेल्या ९४ ग्राम पंचायतींना स्वत:च्या इमारती नव्हत्या. त्यामुळे गावाचे महत्वाचे दस्ताऐवज भाड्याच्या कौलारू खोलीत ठेवावे लागत होते. पाऊस व उंदरांमुळे या दस्ताऐवजास धोका निर्माण झाल्याने शासनाने गडचिरोली जिल्ह्यात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत १४ ग्राम पंचायतींना नवीन इमारत उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर केला. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्राम पंचायतीला १२ लाख रूपयांचा निधी प्राप्त करून दिला जातो. यामध्ये केंद्राचा वाटा ९ लाख रूपये व जिल्हा विकास निधीतून ३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यायचा होता. या अंतर्गत केंद्र शासनाचा प्रत्येकी ४.५ निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून काही ग्राम पंचायतींचे स्लॅब लेव्हलपर्यंत बांधकामही करण्यात आले आहे. उर्वरित बांधकाम मात्र निधी अभावी रखडले आहे. महत्वाचे म्हणजे जिल्ह्याच्या विकासात महत्वपूर्ण जबाबदारी निभविणाऱ्या जिल्हा नियोजन व विकास समितीनेही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. वर्षभराचा कालावधी लोटूनही रूपयाचाही निधी ग्राम पंचायत इमारतीसाठी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून जिल्हा नियोजन व विकास समितीच्या धोरणाविषयीही तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. (नगर प्रतिनिधी)
नक्षल्यांच्या धमकीने गावकऱ्यांनी पैसे केले परत
४भामरागड व एटापल्ली हे दोनही तालुके नक्षलदृष्ट्या संवेदनशील मानले जातात. भामरागड तालुक्यातील धिरंगी, कुव्वाकोडी, नेलगुंडा ही अतिशय दुर्गम भागात असलेली गावे आहेत. या गावांमध्ये ग्रामपंचायत इमारत मंजूर झाल्याचे नक्षल्यांना माहित पडताच त्यांनी गावकरी व ग्रामसेवकास ग्रामपंचायती इमारत न बांधण्याची धमकी दिली. त्यामुळे धास्तावलेल्या गावकऱ्यांनी बांधकाम सुरू केले नाही. एवढेच नाही तर प्राप्त झालेला ४.५ लाखांचा निधीही परत केला आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता या गावांऐवजी कोरची तालुक्यातील सातपुती, अहेरी तालुक्यातील मद्दीकुंब व गडचिरोली तालुक्यातील गिलगाव या गावांची निवड केली असून त्या गावांमध्ये ग्रामपंचायतीचे बांधकाम केले जाणार आहे.
जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतींना मंजूर झाल्या इमारती
गडचिरोली तालुक्यातील राजोली, विहीरगाव, चामोर्शी तालुक्यातील ठाकरी, जैरामपूर, कोरची तालुक्यातील कोरची, मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली, सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलरावपेठा, अहेरी तालुक्यातील खमनचेरू, इष्टापूरदौड, भामरागड तालुक्यातील धिरंगी, कु व्वाकोडी, आरेवाडा, नेलगुंडा, एटापल्ली तालुक्यातील चोखेवाडा या ठिकाणच्या ग्रामपंचायतींना शासनाकडून इमारती मंजूर झाल्या आहेत.