गोंधळ याद्यांचा; मन:स्ताप नागरिकांना
By Admin | Updated: March 13, 2015 00:08 IST2015-03-13T00:08:03+5:302015-03-13T00:08:03+5:30
२०११ मध्ये सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या प्रारूप याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

गोंधळ याद्यांचा; मन:स्ताप नागरिकांना
दिगांबर जवादे गडचिरोली
२०११ मध्ये सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या प्रारूप याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. गडचिरोली शहरात सहा केंद्रांवर या याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली होती. त्यामुळे ‘लोकमत’ने गुरूवारी शहरातील चार केंद्रांवर स्टिंग आॅपरेशन करून प्रारूप याद्यासंदर्भातील स्थितीची नेमकी माहिती जाणली. अनेक केंद्रावर समाविष्ट असलेल्या चार वार्डापैकी एकाच वार्डाची यादी असल्याचे दिसून आले. इतर तीन वार्डातील नागरिकही यादी पाहण्यासाठी आले असता, त्यांना संबंधित वार्डाची यादीच उपलब्ध नसल्याचे केंद्रप्रमुखांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे शहरातील नागरिक या प्रकारामुळे गोंधळून गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
गडचिरोली शहरात महात्मा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळा, नगर परिषद प्राथमिक शाळा लांजेडा, राजीव गांधी नगर परिषद प्राथमिक शाळा आठवडी बाजार, उच्चश्रेणी नगर परिषद प्राथमिक शाळा रामपुरी वॉर्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद प्राथमिक शाळा कॉम्प्लेक्स व गोकुलनगर येथील सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा या सहा ठिकाणी प्रारूप याद्या बघून आक्षेप नोंदविण्यासाठी केंद्रांची निर्मिती करण्यात आली. या सहा केंद्रांवर शहरातील २३ वार्डातील नागरिक आपले आक्षेप देऊ शकतील, असेही प्रशासनाने जाहीर केले होते. प्रत्येक केंद्राला चार किंवा पाच वार्ड जोडण्यात आले आहे.
आज लोकमतने सर्वप्रथम महात्मा गांधी नगर परिषद शाळा (बेसिक शाळा) केंद्राला दुपारी १.१० वाजता भेट दिली. या केंद्रावर महात्मा ज्योतिबा फुले वॉर्ड, सर्वोदय वॉर्ड, लांजेडा वॉर्ड व रामपुरी वॉर्ड हे भाग जोडण्यात आले. मात्र येथे महात्मा ज्योतिबा फुले वॉर्ड, सर्वोदय वॉर्ड, रामपुरी वार्डच्या एकही याद्या प्राप्त झाल्या नव्हत्या. लांजेडा वार्डाच्या चार पैकी केवळ दोनच याद्या केंद्रप्रमुखाकडे दिसून आल्या.
त्यानंतर आठवडी बाजारातील राजीव गांधी नगर परिषद शाळेतील केंद्राला भेट दिली असता, पंडित जवाहरलाल नेहरू वार्डातील तीन याद्यांपैकी केवळ एक यादी प्राप्त झाली होती. तर दोन याद्या अप्राप्त होत्या. महात्मा गांधी वार्डाची एकही यादी उपलब्ध नव्हती. सुभाष वार्डाच्या पाच पैकी तीन याद्या अप्राप्त होत्या. चंद्रपूर मार्गावरील नागरिकांच्या दोन याद्यांपैकी केवळ एकच यादी प्राप्त झाली होती. रामपुरी वार्डातील उच्चश्रेणी नगर परिषद शाळेतील केंद्रामध्ये कन्नमवार नगरातील नागरिकांची एकही यादी उपलब्ध नव्हती. रामनगर व छत्रपती शिवाजी नगरातील मात्र चारही याद्या उपलब्ध होत्या. छत्रपती शाहू नगरातील सात याद्यांपैकी केवळ दोन याद्या प्राप्त झाल्या असून पाच याद्या अप्राप्त होत्या.
लांजेडा वार्डातील संत जगनाडे महाराज नगर परिषद प्राथमिक शाळेतील केंद्रामध्ये इंदिरानगर, स्नेहनगर, कॅम्प एरिया व रामपूर तुकूम या चार वार्डांचा समावेश आहे. यातील कॅम्प एरिया व इंदिरानगरातील सर्वच याद्या प्राप्त झाल्या होत्या. स्रेहनगरच्या पाच याद्यांपैकी केवळ एक यादी उपलब्ध झाली. तर चार याद्या उपलब्ध झाल्या नव्हत्या. रामपूर तुकूम येथील चार याद्यांपैकी तीन याद्या अप्राप्त होत्या. या परिस्थितीमुळे अनेक नागरिक आपल्या यादीबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी केंद्रावर पोहोचले तरी त्यांना याद्या नसल्यामुळे काहीही माहिती केंद्रप्रमुखाकडे देता आली नाही. प्रशासनाच्या या गोंधळी कारभारामुळे मुदतीच्या आत आक्षेप नोंदविता कसे येतील, असा प्रश्न नागरिक करीत होते. एकूणच दफ्तर दिरंगाईपणाचे हे एक मोठे उदाहरणच म्हणावे लागेल. ज्या केंद्रांवर लोकमत प्रतिनिधीने भेट दिली, तेथे कार्यरत केंद्र अधिकाऱ्यांनी ५ मार्च पासून या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे, असे सांगितले. मात्र नागरिकांचा अल्प प्रतिसाद असल्याचे ते म्हणाले. याद्या नसणे हे अल्प प्रतिसादाचे महत्त्वाचे कारण असल्याचे दिसून आले.