रोमपल्ली मार्गाची दुरवस्था कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:25 IST2021-06-24T04:25:25+5:302021-06-24T04:25:25+5:30
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर ते रोमपल्ली या २७ किमी मार्गाच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला. निधीदर्शक फलकही बांधकाम विभागाने ...

रोमपल्ली मार्गाची दुरवस्था कायमच
झिंगानूर : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर ते रोमपल्ली या २७ किमी मार्गाच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला. निधीदर्शक फलकही बांधकाम विभागाने लावले आहेत ; परंतु या मार्गाच्या डांबरीकरणासाठी दिरंगाई होत आहे. परिणामी या मार्गाने ये-जा करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील झिंगानूर ते सिरकोंडा पर्यंतचे अंतर १७ किमी आहे. या रस्त्याचे सुद्धा डांबरीकरण करण्यात आले नाही. झिंगानूर ते रोमपल्ली हे अंतर २५ किमी आहे. या भागात आदिवासी बांधव बहुसंख्येने आहेत ; परंतु या गावांमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. सातत्याने मागणी करूनही शासन व प्रशासनाने या बाबीकडे लक्ष दिले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून झिंगानूर परिसरातील नागरिक रस्ते व पुलाच्या समस्येपासून त्रस्त झाले आहेत. विद्यमान सरकारने याकडे लक्ष देऊन झिंगानूर परिसरातील दळणवळण व आवागमन समस्या मार्गी लावावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दुरूस्तीकडे दुर्लक्ष हाेत आहे.