धानापेक्षा कोंडा महाग
By Admin | Updated: December 13, 2014 22:39 IST2014-12-13T22:39:46+5:302014-12-13T22:39:46+5:30
धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी संघर्ष करीत असला तरी धानापासूनच तयार होणाऱ्या कोंड्याची मागणी विटा निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धानाच्या तुलनेत कोंडा महाग झाला आहे.

धानापेक्षा कोंडा महाग
कोट्यवधींंचा नफा : विटा व्यवसायासाठी मागणी वाढली
देसाईगंज : धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी संघर्ष करीत असला तरी धानापासूनच तयार होणाऱ्या कोंड्याची मागणी विटा निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धानाच्या तुलनेत कोंडा महाग झाला आहे.
पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धानपिकांचे प्रचंड प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा अपुऱ्या उपलब्ध आहेत. यावर्षी कमी पाऊस झाल्याने धानाच्या उत्पादनात घट झाली आहे. काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे अशक्य आहे. अशी परिस्थिती असतांना केंद्र शासनाने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याने धानाचे भाव पडले आहेत. व्यापाऱ्यांकडून १ क्ंिवटल धानाला १ हजार ३०० ते २ हजार रूपयांपर्यंतचा भाव दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आणखी तोटा होणार असल्याने धानाचे भाव वाढविण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी संघर्ष सुरू केला आहे.
धानाच्या पिसाईनंतर तयार होणाऱ्या कोंड्याला पंधरा वर्र्षांपूर्वी काहीच किंमत नव्हती. अनेक राईस मिलधारक कोंडा फेकून देत होते. मात्र विटा भाजण्यासाठी धानाच्या कोंड्याचा वापर केला जाऊ लागल्यानंतर धानाच्या कोंड्याला सोन्याप्रमाणे भाव मिळू लागला आहे.
कोंड्यापासून भाजलेल्या विटेला चांगला भाव मागणी असल्याने विटा व्यावसायिकही राईस मिलधारक मागेल तेवढी किंमत द्यायला तयार होत आहेत. त्याचबरोबर धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये तयार होणाऱ्या कोंड्याची मागणी पश्चिम विदर्भातील विटा व्यवसायिकांकडूनही वाढली असल्याने कोंड्याचे भाव आणखीच वधारले आहेत.
गंजावर विक्रीसाठी नेलेला धान दोन दिवस पडून राहील. मात्र कोंडा विटा व्यावसायिकांकडून कोंडा सहज खरेदी केला जात आहे. कोंड्याच्या उत्पन्नातून वीजबिलाचा खर्च सहज निघणे शक्य झाले आहे. शेतकरी धान पिसाईसाठी राईस मिलमध्ये नेतात. धान पिसाईची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल केली जाते. त्यांच्याच धानाचा कोंडा नेण्यावर मात्र राईस मिल धारकांकडून प्रतिबंध घालण्यात येते. व वाचलेला कोंडा विटा व्यावसायिकांना आठ हजार रूपये ट्रॅक्टर या दराने विकला जात आहे.
विटा निर्मितीच्या कामाला आता धान निघाल्यानंतर सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोंडा मिळविण्यासाठी विटा व्यावसायिकांमध्ये स्पर्धा चालली असून याचा फायदा घेत राईस मिलधारकांनी कोंड्याची किंमतही वाढविली आहे. (वार्ताहर)