देसाईगंज नगर परिषदेच्या स्थापनेला ५५ वर्षे पूर्ण

By Admin | Updated: May 1, 2016 01:16 IST2016-05-01T01:16:44+5:302016-05-01T01:16:44+5:30

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली. राज्य निर्मितीनंतर एकाच वर्षाने ...

The completion of 55 years for the establishment of DesaiGanj Municipal Council | देसाईगंज नगर परिषदेच्या स्थापनेला ५५ वर्षे पूर्ण

देसाईगंज नगर परिषदेच्या स्थापनेला ५५ वर्षे पूर्ण

कमी लोकसंख्येची नगर परिषद म्हणून परिचित : १ मे १९६१ मध्ये देसाईगंज ग्रा. पं. चे रूपांतर
देसाईगंज : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली. राज्य निर्मितीनंतर एकाच वर्षाने स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या मागणीला होकार देत तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १ मे १९६१ ला वडसा ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर केले. तत्कालीन परिस्थितीनुसार केवळ ५ ते ७ हजार लोकसंख्या असलेली नवीन नगर परिषद चंद्रपूर जिल्ह्यात नावारूपास आली. सर्वात कमी लोकसंख्येची नगरपरिषद म्हणून देसाईगंजची तेव्हा ओळख निर्माण झाली होती़ रविवार १ मे २०१६ ला देसाईगंज नगर परिषदेचा ५५ वा वर्धापन दिन आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेपूर्वी सी. पी. अ‍ॅन्ड बेरार काळात जुन्या मध्यप्रदेश राज्याचा एक भाग होता. मध्यप्रदेश राज्याचे आयुक्तालय चंद्रपूरस्थित होते. चंद्रपूरचे तत्कालीन सहआयुक्त सी. सी. देसाई यांनी १९३३ मध्ये देसाईगंज शहराची स्थापना केली. केवळ ५ ते ७ हजार लोकसंख्येच्या वडसा व नैनपूर ग्रामपंचायतीच्या विलिनीकरणातून १ मे १९६१ साली देसाईगंज नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली़ वडसा रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर हरबाजी हटवार यांचे सी. सी. देसाई यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते़ एकदा देसाई शहरात भेटीदरम्यान आल्यावर शहराला मध्यवर्ती स्थान व रेल्वेस्थानक तसेच धानाची मोठी आवक असल्यामुळे भविष्यात येथे मोठी बाजारपेठ तयार होऊ शकते, यासाठी स्थानिकांनी प्रयत्न करण्याचा सल्ला देसाई यांनी दिला होता. त्याला अनुसरूनच हरबाजी हटवार, बिडी ठेकेदार हाजी अब्दुल रफी यांनी प्रयत्न चालविले़ १९३३ साली हाजी अब्दुल रफी यांच्या अध्यक्षतेखाली सहआयुक्त सी. सी. देसाई यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून सहआयुक्त सी. सी. देसाई यांच्या नावाने देसाईगंज शहराची कोनशिला ठेवली़ यावेळी हरबाजी हटवार हे सचिव म्हणून मंचकावर हजर होते़
वडसा रेल्वेस्थानकाला देसाईगंज म्हणून नवीन नाव मिळाले़ देसाईगंज हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथून सगळीकडेच व्यापाराची जडणघडण होऊ लागली़ ग्यानचंद शर्मा, अ‍ॅड. ग. म. हटवार व अन्य नागरिकांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर लगेच एका वर्षाने १ मे १९६१ ला वडसा व नैनपूर ग्रामपंचायत विलिन करून देसाईगंज नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली़ चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीयस्तरावर ग्यानचंदजी शर्मा यांची तत्कालीन नगराध्यक्ष म्हणून नेमणूक केली़ १ मे १९६१ ते १८ डिसेंबर १९६२ पर्यंत ते नगराध्यक्ष होते़ शासकीय नियुक्ती असल्यामुळे त्यांची नियुक्ती खारिज करून १९६२ साली नगर परिषदेची सार्वजनिक निवडणूक घेण्यात आली़ अ‍ॅड. ग. म. हटवार यांनी शहरातील १३ जागांपैकी १२ जागांवर आपला कब्जा केला़ सर्वसंमतीने अ‍ॅड. ग. म. हटवार हे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बनले़ हाती सत्ता आल्यावर केवळ १७०० रूपये हातात घेऊन नगरपरिषदेचा कारभार सुरू झाला़ तेव्हा शहराची लोकसंख्या केवळ ५ ते ७ हजार होती़ नगरपरिषदेचा वर्षाचा बजेट केवळ ५० हजार रूपयांचा राहत होता. सध्या देसाईगंज शहराची लोकसंख्या ४० हजारावर पोहोचली आहे़ एका वर्षाचा बजेट ५ कोटींवर घ्यावा लागत आहे. सन १९६४ मध्ये शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. तेव्हा नगरपरिषदेकडे नळयोजनेसाठी भरावयास लागणारी रक्कम १९ हजार रूपये देखील नव्हते. निवडून आलेल्या सभासदांनी वर्गणी काढून ती रक्कम जमा केली. शासनाच्या विविध अनुदानातून शहरात विकासात्मक कामे होत गेली़ सन १९९१ ते १९९६ च्या काळात शहरात अग्नीशमन वाहन, रूग्णवाहिका आली़ तसेच शहरात विविध विकासकामे होत आहेत. शहरातील रस्ते, नाली यांचे बांधकाम करण्यात आले. शहरात दुतर्फा पथदिव्यांची सोय, क्रीडा संकूल सभागृह तयार करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात भरभराटीस आले असलेली नगरपरिषद म्हणून देसाईगंज पालिका नावारूपास आली आहे. (वार्ताहर)

Web Title: The completion of 55 years for the establishment of DesaiGanj Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.