जिल्हाधिकारी, जि.प. सीईओंनी केला गुप्त दौरा
By Admin | Updated: September 6, 2014 23:47 IST2014-09-06T23:47:17+5:302014-09-06T23:47:17+5:30
तालुका ठिकाणच्या शासकीय कार्यालयातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रणजितकुमार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी संयुक्तरित्या शनिवारी दुपारच्या

जिल्हाधिकारी, जि.प. सीईओंनी केला गुप्त दौरा
एटापल्ली : तालुका ठिकाणच्या शासकीय कार्यालयातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी रणजितकुमार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी संयुक्तरित्या शनिवारी दुपारच्या सुमारास एटापल्ली तालुक्याचा गुप्त दौरा केला. दरम्यान पंचायत समिती कार्यालयातील अनेक कर्मचारी गैरहजर दिसून आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
यापूर्वीही जिल्हाधिकारी रणजितकुमार व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी धानोरा, कोरची व अन्य तालुक्यात गुप्त दौरा करून प्रशासकीय कामाची पाहणी केली. दरम्यान अनेक शाळांमध्ये शिक्षक गैरहजर असल्याचे दिसून आले होते. दुर्गम भागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून योग्य सेवा देत नाही. याचा परिणाम शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे जिल्हाधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्या काही दिवसांपासून गुप्त दौऱ्याचा सपाटा लावला आहे.
शनिवारी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एटापल्लीच्या पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली. दस्ताऐवजाची तपासणीही त्यांनी केल्याची माहिती आहे. यावेळी पं.स. कार्यालयात संवर्ग विकास अधिकारी लुटे यांच्यासह अनेक कर्मचारी गैरहजर होते. याबाबत जिल्हाधिकारी रणजितकुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला भेट देऊन तेथील कामांची माहिती जाणून घेतली.