नोकऱ्या मागणारे नव्हे, देणारे हात तयार करणार; एकनाथ शिंदे यांची ग्वाही
By संजय तिपाले | Updated: January 9, 2024 18:43 IST2024-01-09T18:43:13+5:302024-01-09T18:43:30+5:30
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा गडचिरोलीतून प्रारंभ.

नोकऱ्या मागणारे नव्हे, देणारे हात तयार करणार; एकनाथ शिंदे यांची ग्वाही
गडचिरोली: महिला सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत, त्यांच्यातील क्षमतांना योग्य दिशा व न्याय देण्यासाठी महिलांमधून उद्योजिका तयार व्हाव्यात यादृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असून याद्वारे महिलांच्या आयुष्यात नवी क्रांती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
शहरातील एमआयडीसी परिसरातील कोटगुल रोडलगतच्या मैदानावर ९ जानेवारीला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, उप महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, जि.प. सीईओ आयुषी सिंग, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे, माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राला कर्तृत्ववान महिलांचा भक्कम वारसा आहे. महिला त्यागाचं प्रतीक आहेत, त्यांना पाठबळ देण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी हे अभियान राज्यभर राबविले जाणार आहे. नोकऱ्या देणारे हात तयार करा, असे बाळासाहेब ठाकरे सांगत, त्यानुसार नोकऱ्या मागत असतानाच नोकऱ्या देणारे हात देखील तयार करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. काैशल्यविकासाला चालना देण्यासाठी बचत गटांच्या उत्पादनांचे ब्रँडींग, मार्केटिंग व विक्री यासाठीसरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या नऊ महिलांचा गौरव करण्यात आला. विविध योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरुपात देण्यात आला. तत्पूर्वी विविध योजनांच्या स्टॉलवर भेटी देऊन मान्यवरांनी पाहणी केली. विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
बसस्थानकात बचत गटांचा स्टॉल
प्रत्येक बसस्थानकात बचत गटांसाठी एक स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. जिल्ह्यातील सर्व बचत गटांच्या उत्पादनांना या स्टॉलमध्ये रोटेशनप्रमाणे विक्रीसाठी संधी उपलब्ध करुन दिली जाईल, अशा पध्दतीने नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला बचत गटांना दिलेले पैसे बुडत नाहीत: उपमुख्यमंत्री फडणवीस
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महिला बचत गटांना कर्ज दिल्यास ते बुडत नाही, शंभर टक्के परतफेड होते, पण पुरुषांना कर्ज दिल्यास ते बुडते. पुरुषांना व्यसन करण्याची सवय असते. महिला मात्र पै- पै जमवतात व आपल्या संसाराला लावतात. महिलांना प्राधान्याने उद्योग, व्यवसायासाठी कर्ज दिले जाणार असून एक महिला सक्षम झाली की कुटुंब सक्षम होते, त्यामुळे हे अभियान महिलांच्या आयुष्यात परिवर्तन आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाण्यावाचून गैरसोय, महिला चार तास ताटकळल्या
या अभियानसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो महिलांना आणले होते. सिरोंचासारख्या दुर्गम तालुक्यातून एक दिवस आधीच महिला आल्या होत्या. मात्र, कार्यक्रमस्थळी महिलांना पिण्यासाठी पाणी नव्हते, सुरक्षेच्या कारणास्तव महिलांची कसून झडती घेत जवळील पाण्याच्या बाटल्या काढून घेतल्या. आता गेल्यावर पाणी न मिळाल्याने महिलांची गैरसोय झाली. सकाळी ११ वाजताच्या कार्यक्रमासाठी दहा वाजेपासूनच महिला, विद्यार्थिनी आल्या होत्या. दुपारी २ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली, त्यामुळे तब्बत चार तास महिला ताटकळल्या होत्या.